आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची व्यथा:मंगळवारी 4 तासांनंतरही एसटी नसल्याने लाेणीच्या यात्रेकरूंचा बसस्थानकात ठिय्या

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना स्थानकावर दाखल होणाऱ्या १३०० बसेसची नोंद, चौकशीला उत्तर देण्यासाठी केवळ पाच कर्मचारी आहेत. सतत फाेन हाेल्डवर असताे, तर चाैकशी खिडकीवर वेटिंग असते. तासंतास प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना एसटी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने जालना बसस्थानक पूर्णत: अनकंट्रोल झाले आहे. मंगळवारी चार तास ताटकळल्यानंतर चक्क एसटीचे गेट अडवून लोणीच्या यात्रेकरुंना बस मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन करावे लागले.

सेवेबद्दल उत्तर देण्यासाठी एकही अधिकारी नसल्याची बाब जालना बसस्थानकात घडत आहे. जालना स्थानकातून दिवसाला तब्बल १ हजार ३०० बसेसची ये-जा होते. हजारो प्रवासी यातून प्रवास करतात. या प्रवाशांना चौकशी कक्षातून माहिती देणे, आलेल्या एसटीची एंट्री करणे, शिवाय इतर बसेसची अनाउन्समेंट करणे आदी बाबी करण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाही. यामुळे चालकांबरेाबरच प्रवाशांनाही खिडकीवर प्रतीक्षा करावी लागत आहे. या ठिकाणी केवळ पाच कर्मचारी असल्याने मोठी फरपट होत आहे. या ठिकाणी चौकशीसाठी येणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कुणीच वाली नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. फाेनही सतत होल्डवर असताे.

सायंकाळी ७ वाजता मिळाली बस
लोणार सरोवर जवळील श्रीक्षेत्र लोणी येथे सखाराम महाराज यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांना मंगळवारी दुपारी चार वाजेपासून एसटी उपलब्ध नसल्याने वैतागलेल्या प्रवाशांना कोणत्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावी हेच कळले नाही. सायंकाळी सहा वाजेनंतर त्यांना एसटी आगाराच्या गेटवरील वॉचमन यांनी अरेरावी केल्यानंतर संतप्त प्रवाशांनी थेट गेट अडवण्याचा निर्णय घेतला. आगारात जाणाऱ्या सात ते आठ बसेस अडवल्या. यात्रेकरूंनी थेट गेटवर ठिय्या देण्याची भूमिका घेतल्यानंतर सायंकाळी सात वाजता लोणीसाठी विशेष गाडी देण्यात आली.

सायंकाळची गर्दी लक्षात घेता उशिराने नियोजन
लोणीच्या यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन असल्याने दिवसभर गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, सायंकाळची गर्दी लक्षात घेता उशिराने नियोजन करण्यात आले. प्रवाशांची माहिती मिळाली नसल्याने यात्रेच्या बसचे नियोजन केले नाही. सात वाजेनंतर एसटी देण्यात आली. - सुहास सोनुने, वाहतूक निरीक्षक, जालना

गाड्या थांबवल्या म्हणून आले अधिकारी चौकशीसाठी
एकाही अधिकाऱ्यांनी आमची विचारणा केली नाही. चार वाजेपासून लोणी साठी एसटी केव्हा लागेल याचीच माहिती विचारली. सरळ कुणीही काही सांगू शकले नाही. तीन ते चार तासानंतर गेटवर बसलो. गाड्या थंाबल्या म्हणून चाैकशी झाली. तेव्हा अधिकारी चौकशीसाठी आमच्याकडे आले.
- अंगद चिनके, प्रवासी, राजापूर गंगावाडी

चौकशी कक्षातही एकच अधिकारी, तोही बोलेना
जालना बसस्थानकावर चौकशी करण्यासाठी गेल्यावर या ठिकाणी मोठी गर्दी होती. विचारणारे दहा बारा अन् सांगायला एकच अधिकारी हाेता. त्यात कंडक्टर कागद घेऊन येत होते. आम्हाला गाडीची माहितीही लवकर मिळाली नाही. खात्रीच्या एसटीकडून आमची मोठी दैना झाली. भीमराव दांडगे, भाविक अ.नगर

बातम्या आणखी आहेत...