आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिल:अंगाची कातडी काढून जोडे शिवले तरी आई-वडिलांचे उपकार फिटणार नाहीत

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आई-वडील आपल्या मुलांना लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत काचेच्या भांड्याप्रमाणे जपत असतात. परंतु आज समाजात जन्मदात्या आई-वडिलांविषयी प्रेम लुप्त होत चालले आहे. मुलांना तर लग्न झाल्यावर आईवडील ओझे वाटू लागले आहे. परंतु तुम्ही जगभरातील संपत्ती कमवा, तिचे महत्त्व आई-वडिलांसमोर नगण्य आहे. शिवाय तुम्ही तुमच्या शरीरावरची सालटी काढून त्यांना चपला जरी शिवल्या तरी त्यांचे उपकार तुमच्याकडून सात जन्मदेखील फिटू शकणार नसल्याचे निरूपण संतोष महाराज आढावणे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गोदावरीबाई देशमुख यांच्या वर्षाश्राध्दानिमित्त आयोजित कीर्तनसेवेत ते बोलत होते. प्रारंभी गजानन देशमुख यांनी संतोष महाराज यांचा सत्कार केला. आजच्या तरुणांनी श्रावण बाळाप्रमाणे आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. उतारवयातच आई-वडिलांना आपली खरी गरज असते. त्या काळातच त्यांची लहान लेकराप्रमाणे सेवा केली पाहिजे.

कारण आपण लहान असताना आई-वडील आपल्याला मोठे करेपर्यंत मोठे हालअपेष्टा सहन करत असतात. त्यासाठी त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तुम्ही त्यांचे दास व्हा. असे केल्यास परमेश्वर तुम्हाला कशाशीच कमी पडू देणार नाही. न मागता सगळ तुमच्या पदरात टाकेल. लहानपणी तुम्हाला साधा खोकला जरी लागला तर आईवडील लगेच तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातात. परंतु हीच मुले आई वडिलांना उतारवयात अंथरुणावर खिळून पडत असले, तरी पाहात नसल्याची शोकांतिका महाराजांनी बोलून दाखवली. आजच्या तरुणांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाने धेय्याची उंच भरारी घेतली पाहीजे. जो मनामध्ये ध्येय ठेवून वाटचाल करीत असतो. तोच जीवनात यशाचा डोलारा उभा करतो.

इतिहास जर चाळला, तर शिवबांच्या काळातील मावळे हे शिवबांसाठी मृत्यूला आलिंगन देण्यासाठी तयार होते. शिवाबानेदेखील आपल्या आईच्या प्रेरणेने स्वराज्याची स्थापना करुन एक आगळावेगळा कधी न पुसणारा इतिहास रचला आहे. परंतु आजच्या कलयुगातील मावळे हे आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. शिवबांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाची बाजी लावून समाजाची व देशाचे रक्षण केले. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनीदेखील शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले पाहिजे.

शिवाय आज पर्यावरण संतुलन बिघडत चालले आहे. यासाठी प्रत्येक तरुणाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहीजे. प्रत्येकाने आपण निसर्गाचे काही तरी देण लागतो. या उद्देशाने आता पावसाळ्यात एक तरी झाड लावून पर्यावरणाची हानी भरुन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सल्ला आढावणे महाराजांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...