आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायोग हा प्रत्येक समस्येवरील उपाय असून प्रत्येकाने काहीही अपेक्षा न ठेवता स्वत:साठी दररोज ४० मिनिटे गुरुशिष्य परंपरेनुसार योगाभ्यास करावा असे प्रतिपादन आयुष विभागाचे योग प्रशिक्षक मनोज लोणकर यांनी कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी येथे केले. विश्वकल्याणासाठी योगा करावेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी योगाची प्रात्यक्षिकेही करून घेतली.
मराठवाडा शेती सहाय्य मंडळ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच आझादी का अमृत महोत्सव निमित्त खतांचा संतुलित वापर आणि वनशेती बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर, विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी प्रशांत वरुडे, द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. अजयकुमार मिश्रा, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांची उपस्थिती होती. डॉ. सोमकुवर यांनी सांगितले की, द्राक्षाच्या सुदृढ आणि निरोगी घडासाठी शास्त्रोक्त पद्धतीने खरड छाटणी करावी. तसेच संतुलित पद्धतीने खंत व्यवस्थापन करावे. एका वेळीवर २४ काड्या पुरेशा असून रोगनियंत्रणसाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात भगवानराव काळे यांनी मानवी जीवनात योगांचे महत्त्व अणण्यसाधारण असून शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांच्या सांगण्यांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने द्राक्ष बागांचे व्यवस्थापन करावे. असे सांगितले. तत्पूर्वी विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी ३० मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार अमृतमहोत्सवी वृक्ष लागवड योजनेंचा लाभ घ्यावा. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वृक्ष, फळबाग आणि फुलशेती लागवडीचा वैयक्तिक लाभ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर घेता येतो.
या योजनेत द्राक्षाचा सुद्धा समावेश आहे. प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन संगीता कऱ्हाळे यांनी तर मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातून २०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.