आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मालपाणी सरकार आहे. ते टक्केवारी आणि वसुलीत खुश आहे. भाजपच्या काळात आम्ही आणलेल्या योजना रद्द करणे आणि त्यातील काही योजनांचे उद्घाटन करणे इतकेच काम हे सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री कार चालवत आहेत तर हे सरकार देवाच्या भरवशावर सुरू आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते जालना येथे भाजपच्या वतीने आयोजित जलआक्रोश मोर्चात बोलत होते.
जालना शहरातील पाणीप्रश्न आणि इतर नागरी समस्यांवर भाजपच्या वतीने बुधवारी जालना नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मामा चौक येथून हजारो लोकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या माेर्चाचा गांधी चमन येथे समारोप झाला. या वेळी आमदार अतुल सावे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भास्करराव दानवे, राजेश राऊत, मनोज पांगारकर, अतिक खान, बद्री पठाडे आदींची उपस्थिती होती. मी मुख्यमंत्री असताना रावसाहेब पाटील दानवे यांनी शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची मागणी केली. जालना पालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तरीही आम्ही क्षणाचाही विलंब न लावता एका दिवसात या शहरासाठी १२९ कोटींचा निधी दिला. परंतु या निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही. त्यामुळे आज पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे फडणवीस म्हणाले.
मराठवाड्यात उद्योग येणार नाहीत
मराठवाडा आणि विदर्भात उद्योगाचा विकास व्हावा म्हणून आम्ही या भागातील उद्योजकांना विजेमध्ये सबसिडी देण्याची योजना सुरू केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी उद्योगांसाठीच्या अनेक योजना बंद केल्या आहेत. मराठवाड्यातील एकाही शहराला पाण्याची अडचण येऊ नये, म्हणून आम्ही वॉटरग्रीडची योजना तयार केली. परंतु, सरकारने या योजनेचा निधी बंद केल्याचे फडणवीस म्हणाले.
मोर्चा फक्त भाजपचा नव्हे, जालनेकरांचा
जालना शहरातील पाण्यासाठी आयोजित केलेला हा मोर्चा फक्त भाजपचा नाही. या मोर्चात सर्वसामान्य जालनेकरही मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात एकही ठोस काम केलेले नाही. त्यामुळे जालनेकरांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेला हा इशारा असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे याप्रसंगी बोलताना म्हणाले.
भाजपच्या काळातील योजना रद्द करणे हेच काम सुरू असल्याचा आराेप मुख्यमंत्र्यांवर केली सडकून टीका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.