आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कर्जाचे पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याने शनिवारी दीड लाखात घर विकले. त्याचा शंभर रुपये इसारही घेतला. कुटुंबीयांना भाड्याच्या घरात घेऊन जाण्याची तयारी सुरू असतानाच रविवारी त्यांनी सकाळी विष घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे घडली. महादू सुखदेव जाधव (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जाचा बाेजा वाढत असताना परतफेडीसाठी महादू यांच्या खिशात दमडीही नव्हती. दुसरीकडे कर्जदार व बँकेचे कर्मचारी रोज घरी पैशासाठी चकरा मारत हाेते. कर्ज फेडण्यासाठी घर विकल्यानंतर पत्नी व मुलाचे कसे हाेईल ही चिंता त्यांना सतावत होती. महादू अल्पभूधारक शेतकरी होते. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी राहत्या घरावर सावकार आणि खासगी बँकांकडून ३ लाखांचे कर्ज काढत मुलींचे विवाह केले होते. शेतीही उसनवारी करून व कर्ज काढूनच कसावी लागत होती. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. महादू शनिवारी रात्री १० वाजता गव्हाला पाणी देण्यासाठी गेले, परंतु रविवारी सकाळी उशिरापर्यंत घरी परतले नव्हते. त्यामुळे पत्नी आणि मुलाने शेताकडे धाव घेतली. ते कपाशीच्या शेतात पडलेले होते.
भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पिंपळगाव रेणुकाई येथे रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात गावातीलच दीपक देशमुख या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.