आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा शेतकऱ्यांनी जून महिन्यात समाधानकारक पावसावर खरिपाची पेरणी पूर्ण केली. शिवाय सध्या पावसाने मागील चार ते पाच दिवसांपासून ब्रेक दिला आहे. यावर्षी जेमतेम पावसावरच पिके जोमात आहेत. परंतु सोयाबीन पाक ऐन फुलात व फळधारणेच्या अवस्थेत असताना अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सदर अळी ही संपूर्ण झाडच उद्ध्वस्त करीत असल्याने शेती उत्पादनात घट होणार असल्याची शेतकऱ्यांना भीती आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी विविध महागडी औषधी फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, सोयाबीन पिकावर तणनाशक व इतर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

भोकरदन तालुक्यात यंदा पेरणीच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी जवळजवळ एक लाख नऊ हजार हेक्टरवर कपाशी, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर, ज्वारी आदी पिकाची पेरणी मृग नक्षत्रात केली आहे. पेरणी नंतर पावसाचा जोर कमी-अधिक असल्याने पिके देखील जोमात आहेत. यंदा मका पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवत सोयाबीनला अधिकची पसंती देत तालुक्यात जवळजवळ २७ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, सोयाबीन पिकावर सध्या अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधी फवारणी करीत आहेत. यंदा सोयाबीन पिकाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. काही भागांत पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही. त्यात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पेरणी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन संततधार पावसामुळे पिवळे पडले. त्यात आणखी आता रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली आहे. दरवर्षी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातच काही मंडळांत कमी पाऊस झाला असल्याने त्या ठिकाणी पिके धोक्यात आहे. शिवाय परिसरात मागील आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील मक्याचे पीक जमीनदोस्त झाले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आले वर्ष सारखेच : भोकरदन तालुक्यातील शेतकरी गत सहा ते सात वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटांशी सामना करीत असल्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडला आहे. यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर प्रसन्न असला तरी पिकावर विविध रोगाची टांगती तलवार असल्याने या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सध्या तरी शेतकऱ्यांना उसनवारी करीत औषधी फवारणी करीत आहे.

चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव असेल तर औषधी फवारा
सोयाबीन पिकावर जर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर शेतकऱ्यांनी अठरा लिटर पाण्यात डायमिथोएट, क्विनॉलफॉस, मिथिल डेमेटोन औषधीचे २५ मिली मिश्रण करून फवारणी केल्यास चक्रीभुंग्याला आळा बसेल.
नंदकिशोर पायघन, कृषी सहायक

बातम्या आणखी आहेत...