आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे विघ्नहर्त्या:पावसासाठी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे विघ्नहर्त्याला साकडे

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी सर्वत्र विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले, गणेश भक्तांमध्ये उत्सव साजरा करण्याचा उत्साह असला तरी भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. खरिपातले उभे पीक पाण्यावाचून आडवे होण्याची वेळ आलेली आहे. आता विघ्नहर्ताच आपले विघ्न दूर करून लवकर चांगला पाऊस पडू दे असे श्री गणेशाला गावोगावच्या शेतकऱ्यांनी साकडे घातले.

खरीप हंगामातील पिके कापूस मका सोयाबीन सर्वत्र जोमात आहेत मात्र गेल्या पंधरा दिवसापासून भोकरदन तालुक्यात पावसाने उघडीत दिल्याने विशेषता खरीप हंगामातील पेरलेले व जोमात आलेले सोयाबीनचे पीक पाऊस नसल्यामुळे हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांनी मक्का कमी करून सोयाबीनच्या पिकाला जास्त पसंती दिली आहे व मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केलेला आहे. भोकरदन तालुक्यात राजूर व धावडा मंडळाच्या काही भागात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती मात्र आता त्या भागातील शेतकरीही पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भोकरदन तालुक्यात सुरुवातीपासूनच कमी व अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत एकही मोठा पाऊस न झाल्याने केळणा नदी, गिरजा नदी पूर्णा नदी , जुई नदी, तालुक्याच्या या प्रमुख नद्यांना मोठे पूर गेलेच नाही दानापूर येथील जुई धरणात सुद्धा धरण भरण्या इतका पाणीसाठा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. पाऊस उघडल्याने गेल्या आठ दिवसापासून उष्णतेची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत तर दिवसा उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतात उभे असलेले खरीपाची पिके मका, कपाशी, सोयाबीन माना टाकू लागले आहेत ही सर्व परिस्थिती पाहून शेतकरी मात्र हवालदिल झालेले आहेत.

आतापर्यंत जोमात असलेली ही सर्व पिके पावसाअभावी हातातून जातात की काय अशी भिती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. त्यातच महावितरणकडून होणारा विद्युत पुरवठा ही शेती पंपाला सुरळीत होत नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत पाणी असूनही केवळ विजे अभावी आपले मोटार पंप सुरू करून उभ्या पिकाला पाणी देऊ शकत नाही. गणेश उत्सवाच्या दिवशीच देहेड येथील शेतकऱ्यांनी दानापूर येथील महावितरण च्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.

गणरायाला साकडे
भोकरदन तालुक्यात सुरुवातीला काही भागात संततधार पावसामुळे नुकसान झाले होते तर आता मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस उघडल्याने कपाशी, मका आणि सोयाबीनसह सर्वच पिकांना मोठा फटका बसला. आतापर्यंत तालुक्यात मोठे पाऊस न झाल्याने नद्यानालेही कोरडे आहेत. तत्काळ चांगला पाऊस पडावा यासाठी आम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करून साकडे घातले आहे.-भिकनराव वराडे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...