आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात नुकसान:परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासनाच्या मदतीकडे डोळे

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या धुवाधार परतीच्या पावसात भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीसाठी केलेला खर्च देखील यातुन निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक हतबल झाले आहेत. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात ती मदत पडली नसल्याने शेतकरी मागील काही दिवसापासून शासन मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसला आहे. रब्बी पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांचा धोक्यात आला आहे. यासाठी शासनाने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

तालुक्यात जुन ते ऑक्टोबरपर्यंत ९८२.७०.मिलिमिटर पावसाची नोंद आहे. निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. ऐन पिके घरात येण्याच्या काळातच परतीच्या पावसाने धूमाकूळ घालत खरीपातील सोयाबीन, मका, कपाशी पिकाचे मोठे नुकसान केले. पावसाचा जोर अधिक असल्याने शेतात सोंगणी करुन ठेवलेल्या हजारो हेक्टरवरील सोयाबीन व मका पिकांबरोबरच कपाशी, उडीद, तूर, बाजरी या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमिनी खरडून निघाल्या तर पिकांना शेतातच कोंब फुटले. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे देखील प्रशासनाकडून झाले. माञ पुढे काय हा प्रश्न शेतकऱ्यांना सताऊ लागला आहे.

नुकसान झाल्याने हातात काहीच उरले नसल्याने जगावे तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर “आ”वासुन उभा आहे. नुकसान ग्रस्त भागात पंचनामे होऊन बराच कालावधी लोटला गेला. शासनाकडून देखील मदतीचे आश्वासने देण्यात आली. पंरतु अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता शासन मदतीकडे लागल्या आहेत.

शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने खरिपाची पेरणी उसनवारी, बँकाचे कर्ज काढून पूर्ण केली. शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेला खरीप हंगामच यावर्षी निसर्गाने हिरावून घेतला असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. हातात पैसे नसल्याने दिवाळी सण देखील शेतकऱ्यांना साजारा करता आला नाही. दरम्यान ऐन सोंगनी करुन मळणीच्या तयारीत असलेल्या सोयाबीनवर पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शासनाने तत्काळ मदत द्यावी
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले खरीपातील सोयाबीन, मका, कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसात नुकसान झाले. प्रशासनाकडून केवळ पंचनामे करण्यात आले. माञ अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक चणचणीत आहे. रब्बी पेरणीसाठीदेखील शेतकऱ्यांना पैसे नाही. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी. सोंगणी केलेल्या मकाला पूर्णपणे कोंब फुटले होते.
संतोष बनगाळे, शेतकरी पिंपळगाव रे.

बातम्या आणखी आहेत...