आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी सुरु:गुगलपेवर पन्नास हजार; एपीआयने मागवले की गुटखा माफियाने मुद्दामहून टाकले, याबाबत केला जातोय तपास

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथील दोन गटात झालेल्या वादातून पोलिसांनी काही जणांना मारहाण झाल्याची कथीत ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सोमवारी आमदार गोपीचंद पडळकर हे जालन्यात आले असता, नागवे यांनी गुगलपेवर ५० हजार घेतले. त्याचे पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, नागवे यांच्या गुगलपेवर पैसे टाकणारा गुटखा प्रकरणातील आरोपी आहे. एपीआयने पैसे मागवले की, या संशयीत आरोपीने पोलिसांना अडकविण्यासाठी मुद्दामहून गुगलपेवर पैसे टाकले, याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून देण्यात आली आहे.

कोकाटे हदगाव येथे पोळा सणाच्या दिवशी मान मिळण्याच्या कारणातून वाद झालेला आहे. तेव्हापासून या गावामध्ये दोन्ही समाजातील काही कुटूंबामध्ये तेढ निर्माण झालेले आहे. किरकोळ कारणावरुनही या गावात वाद होत असल्यामुळे आष्टी पोलिसांनी वारंवार गावातील नागरिक, तरुणांना समज दिली होती.

परंतू, दोन्ही गटात नेहमीच वाद होत असल्याचे प्रकार वारंवार घडत होते. नेहमी वाद होत असल्यामुळे दोन्ही गटांतील व्यक्तींविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करुन घेतले. परंतू, यानंतरही गावात काही ना काही कारणांमुळे वाद सुरु असल्यामुळे गावात काही खुनासारखी दुर्घटना घडू नये म्हणून दोन्ही गटातील व्यक्तींवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे.

दरम्यान, मारहाण झालेली एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळत चालले आहे. कोकाटे हदगाव येथील प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. दरम्यान, एका गावातील वाद मिटविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सोमवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर मोर्चा झाला आहे. परंतू, पडळकर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन गावातील वाद मिटवायला पाहिजे होता, अशीही ग्रामस्थांतून मागणी होत आहे.

परंतू, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांतून चर्चा होत आहे. दरम्यान, चौकशी अधिकारी असलेले डिवायएसपी राजू मोरे यांच्यावरही काही महिन्यांपूर्वी आरोप झालेले आहेत. त्यांच्या बाबतही पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी गेलेल्या आहेत. यामुळे मोरे यांनाही अत्यंत पारदर्शकपणे ही चौकशी करुन अहवाल द्यावा लागणार आहे. जेणकरुन मोरे यांच्यावरही पुढे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

हे मुद्दे चौकशी अधिकाऱ्यांना हाताळावे लागणार
वारंवार समज देऊनही ऐकत नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला का?, व्हायरल झालेली अॉडीओ क्लिप कोणत्या गटातील व्यक्तींनी काढली, पोलिसांनी बळाचा वापर केला या दिवशी ठाण्यातून कोण व का पळून गेले, आमदार गोपीचंद पडळकर हे एपीआय नागवे यांना कोणत्या भाषेत बोलले, दोन्ही गटातील संशयीत आरोपी हे कोणत्या गुन्हेगारीशी निगडीत आहेत का, पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींचा वापर करण्यात आला का, अधिकाऱ्याच्या गुगलपेवर रक्कम टाकली, तर एसीबीला का तक्रार नाही केली.

चौकशी अहवाल दोन दिवसात देणार
गावात चिघळलेले वातावरण खराब होऊ नये म्हणून पोलिसांना बळाचा वापर करावा लागला का, एपीआयच्या गुगल पे वर रक्कम टाकणाऱ्याचा नंबर गुटखा प्रकरणातील संशयीत आरोपी आहे. पोलिसाला अडकविण्यासाठी मुद्दामहून रक्कम टाकली का, पोलिसाने रक्कम मागितली, रक्कम मागितली असेल तर त्याने एसीबीला तक्रार का नाही केली, या सर्व बाजूंचा तपास करुन वरिष्ठांना अहवाल देत आहोत. -राजू मोरे, डिवायएसपी, परतूर.

अहवाल आला नाही
आष्टी प्रकरणात नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल अजून आलेला नाही. चौकशीत काय अहवाल येतो, त्यानुसार नंतर कारवाई केल्या जाईल.
डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधिक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...