आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील पहिले कृषी भवन जालन्यात उभारण्याची घोषणा करत पालकमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ जून २०२२ रोजी भूमिपूजन केले. मात्र, काही दिवसातच राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिक्षक आमदार निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. मात्र, आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील काम असल्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच अर्थात २५ फेब्रुवारी रोजी निविदा अंतिम होऊन वर्कऑर्डर निघाली असून सोमवारपासून या ठिकाणी कामही सुरू झाले. केंद्र व राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध कृषिविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे कृषी भवन उभारण्यात येत आहे.
यासाठी १४ कोटींचा खर्च होणार असून दोन वर्षांत ही वास्तू आकारास येणार आहे. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाशी संबंधित इतर कार्यालये बांधण्यात येणार आहेत. गतवर्षी झालेल्या सत्तांतरामुळे हे काम थांबवण्यात आले होते. सहा महिन्यांनंतर राज्य शासनाच्या मान्यतेनंतर वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात निविदा काढण्यात आली. कंत्राटदारही निश्चित झाला. त्यातच शिक्षक आमदार निवडणुकीची आचारसंहिता लागली. यामुळे कंत्राटदार निश्चित झाला असला तरी वर्कऑर्डर देता येत नव्हती. मात्र, आता कंत्राटदारास वर्कऑर्डर देऊन काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अगोदरच उशीर झाल्यामुळे पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणचे खड्डे बुजवून जमीन समतल करून घेतली जात आहे.
दोन वर्षांत काम पूर्णत्वास
कृषी भवनाच्या इमारत बांधकामाची वर्कऑर्डर दिली असून २४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल . यात १० कोटी बांधकाम, तर ४ कोटी विद्युतीकरण व इतर कामांवर खर्च होणार आहेत. -राहुल पाटील, कार्यकारी अभियंता, विभाग क्र. १, जालना
"एफडीए''चा पहिला मजला पूर्ण
कृषी भवन व अन्न व औषध विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन एकाच वेळी झाले होते. मात्र, वर्कऑर्डरअभावी कृषी भवनाचे काम रखडले, तर दुसरीकडे वर्कऑर्डर मिळाल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या इमारतीचे काम सुरू होऊन पायाभरणी झाली व आता पहिल्या मजल्यापर्यंत बांधकाम झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.