आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:जालन्यातील 91 कोविड योद्ध्यांची आरोग्य प्रशासनाकडून आर्थिक कोंडी

जालना (बाबासाहेब डोंगरे )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील व्यथा, कागदपत्रे अद्ययावत नसल्याने उशीर झाल्याचा जि.प. चा दावा

जिल्हाधिकारी म्हणाले, काम केले, मग मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे कोरोनाला हरवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या ९१ काेराेना योद्ध्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे मानधन मिळाले नाही. जून महिन्याचे २२ दिवस उलटूनही मानधन न मिळाल्याने राज्याचे अाराेग्यमंत्री राजेश टाेपे यांच्या जिल्ह्यातीलच हे काेराेना याेद्धे अार्थिक काेंडीत सापडले अाहेत. जालन्यात कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त २१ डॉक्टर व ७० कर्मचाऱ्यांची ही व्यथा. दरम्यान, एप्रिलचे १३ लाख ४० हजार तर मे महिन्याचे २१ लाख १९ हजार रुपयांचे वेतन देयक तयार असून जि.प. सीईआेंची सही झाल्यावर संबंधितांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे सूत्रांनी सांगितले. कोरोनाचा संभाव्य धोका अाेळखून जिल्हा रुग्णालय परिसरात मार्च महिन्यात अवघ्या २९ दिवसांत नव्याने कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. या ठिकाणी आवश्यक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने जाहिरात दिली. यानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज केले. यातून निवड झालेल्या २१ डॉक्टर व ७० आरोग्य कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. तातडीने रुजू हाेत त्यांनी रुग्णसेवेला सुरुवातही केली. मात्र, एक महिना झाला, दोन महिने झाले तरी मानधन मिळेना. यामुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. मात्र शासनाकडून बजेट आले नाही, हजेरीपट अद्यावत नाहीत, कागदपत्रे अपूर्ण आहेत, वरिष्ठांकडे फाईल पुटअप केली, अशी करणे देत त्यांना वेळोवेळी परत पाठवले गेले. जीव धोक्यात घालून केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्यामुळे काहींनी वरिष्ठांकडे व्यथा मांडली. पण तेथेही त्यांना थोडं थांबा, आणखी काही दिवस लागतील, असे उत्तर मिळत गेले. आपण रुग्णसेवेसाठी काम करत असून मानधन आज ना उद्या मिळेल, या भरवश्यावर हे कोविड योद्धे अडीच महिन्यांपासून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. यातील एका नर्सला कोरोनाची बाधाही झाली होती. मात्र, यशस्वी उपचारानंतर तिने कोरोनावर मात करून पुन्हा सेवा सुरू केली. अशा परिस्थितीतही डगमगता हे कोविड याेद्धे रुग्णांना बरे करण्यासाठी काम करत आहेत. एनएचएमकडून ३४ लाखांची देयके तयार, आता प्रतीक्षा सीईओंच्या स्वाक्षरीची जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल कंत्राटी तत्वावरील २१ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४ एप्रिल २०२० रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशावरून नियुक्ती देण्यात आली होती. यानुसार डॉक्टर तातडीने रुजू झाले. शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे यातील १२ डॉक्टरांना जालन्यात तर उर्वरित नऊ जणांना प्रा. आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. याबाबत रुजू अहवाल डीएचओ डॉ. विवेक खतगावकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठाेड यांच्या स्वाक्षरीने २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला. सीईओंच्या सहीनंतर मानधन खात्यात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अद्यावत रुजू अहवाल १२ जूनला प्राप्त झाला. संबंधितांकडून बँक खाते क्रमांक, विभागप्रमुखांकडून नव्याने रुजू डॉक्टरांचा रुजू अहवाल व हजेरीपट यायला उशीर झाला. आम्ही देयके तयार केली. आता फाइलवर जि.प. सीईओंची सही होताच मानधन खात्यात जमा होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काम केले तर मानधन मिळालेच पाहिजे कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम केले आहे, यामुळे त्यांना वेळेवर मानधन मिळालेच पाहिजे. हजेरीपट आले नाही किंवा तत्सम कागदपत्रे बाकी आहेत, असे म्हणून मानधन देण्यास विलंब लावता कामा नये. याबाबत आजच संबंधितांना बोलून हा विषय मार्गी लावतो. रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना दिव्य मराठी ब्रेकिंग व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्यथा : कोविड हॉस्पिटलमध्ये रुजू होऊन ७ जून रोजी दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत पगार नाही. पगार कधी होईल, असा एका आरोग्य कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅपवर संबंधिताला प्रश्न केला आहे. नियुक्त डॉक्टर व कर्मचारी : कोविड हॉस्पिटलसाठी २१ वैद्यकीय अधिकारी, आठ आरोग्य सेविका, दोन आरोग्य सेवक, दोन आरोग्य सहाय्यक, ४४ अधिपरिचारिका, १२ औषधनिर्माता अधिकारी, दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...