आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या विषयावर २७ जानेवारी रोजी वडीकाळ्या ग्रामस्थ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यादरम्यान चर्चा झाली. मात्र, या चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाबद्दल कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक घेतली. मात्र, त्यातही कोणताच तोडगा निघाला नसून ही बैठकही वांझोटी ठरली. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि काही तरुणांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात मनोज जरांगे पाटील किंवा ग्रामस्थ एकटे नसून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हा वडीकाळ्या ग्रामस्थांच्या बरोबर आहे. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
या वेळी जगन्नाथ काकडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे, राजेंद्र दाते पाटील, चंद्रकांत भराड, शरद देशमुख, माउली कदम, संदीप ताडगे, सदाशिव भुतेकर, योगेश पाटील, राम कुऱ्हाडे, पंकज जऱ्हाड, राम सावंत, रमेश गजर, कृष्णा पडूळ आदींची उपस्थिती होती.
औरंगाबादला गाेलमेज परिषदेचे करणार आयोजन मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे, जातीनिहाय जनगणना, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजभवनामध्ये भव्य स्मारक, कोपर्डीच्या भगिनींना न्याय आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात समाजाचा लढा तीव्र करण्यासाठी लवकरच औरंगाबाद येथे राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करून वडीकाळ्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून सक्रिय पाठिंबा देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी सांगितले. वेळप्रसंगी राज्यभर तीव्र आंदोलनदेखील छेडले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.