आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे जिल्ह्यातून जालन्यात आणल्या जाणाऱ्या ७९ तलवारींचे प्रकरण ताजे असतानाच जालन्यातील गावठी कट्ट्यांद्वारे वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. गुन्हेगार आता गावठी कट्टे बाळगून जास्त गुन्हे करत असल्याचे समोर आले. मागील वर्षभरात मराठवाड्यात विविध जिल्ह्यांमध्ये ५३ ठिकाणी पिस्तूल वापरून गुन्हे झाले. पिस्तुलांचा आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना नुकतीच जालना पोलिसांनी अटक केली. गावठी कट्ट्यांचे हे रॅकेट मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातून चालते. डोंगराळ भाग, घनदाट वृक्षांमध्ये गुन्हेगारांचे अड्डे असून जालना-आैरंगाबाद पोलिसांनी अड्डे उद्ध्वस्त करण्याचा चार वेळा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये छुप्या पद्धतीने गावठी पिस्तूल आणी कट्टे तयार केले जातात. या कट्ट्यांची जळगावमार्गे खासगी वाहनांद्वारे आणून विक्री केली जाते. १५ ते ५५ हजारांपर्यंत या शस्त्रांचा दर असतो.
रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला; प्रत्येक जिल्ह्यात दलाल सक्रिय
गुन्हेगारांसह वाळू माफियांकडेही
गुन्हेगारांच्या हाती चाकू, सुरा, तलवारीऐवजी आता पिस्तूल, रिव्हॉल्व्हर सर्रास दिसू लागले आहेत. गुन्हेगारांच्या जोडीला वाळू माफियासुद्धा बेकायदा शस्त्रे बाळगू लागले आहेत. दमदाटी, धमकावणे, वसुली यासाठी त्याचा वापर वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यात पिस्तूल खरेदी-विक्रीचे दलाल सक्रिय आहेत.
नांदेड : महिनाभरात पाच पिस्तूल जप्त
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांकडून शहर व जिल्ह्यात कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यात ४३ तलवारी, २८ खंजीर, चाकू, १० नकली व ५ खऱ्या पिस्तुल जप्त करण्यात आल्या. तसेच ५० जणांवर गुन्हे दाखल झाले. संजय बियाणी यांच्या घरासमोर ५ एप्रिल रोजी गोळीबार झाल्यानंतर हत्येने महाराष्ट्राला हदरा बसला. यातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत.
जालना जिल्ह्यात पिस्तूलचा १५ दिवसांत दोनदा वापर
गावठी पिस्तूल दाखवून मंठा रोडवर सराफा व्यापाऱ्याला साडेचार लाखांना लुटण्यात आले. बदनापूर रोडवर पेट्रोल पंपावरील सेल्समनला पिस्तूलचा धाक दाखवून ८० हजार पळवले. पंधरा दिवसांत या दोन घटना घडल्या आहेत. २३ फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथेही तीन पिस्तुलांसह आरोपी जेरबंद केले आहेत.
आरोपींनी जागा बदलल्याने पकडण्याचा प्रयत्न फसला
काही वर्षांपूर्वी औरंगाबाद तपासाच्या अनुषंगाने मध्य प्रदेशातील एका ठिकाणी अवैध पिस्तूल तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने आरोपी ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो, परंतु आरोपी हे सातत्याने जागा बदलत होते. तसेच जंगल, वन, दऱ्या असल्यामुळे हा प्रयत्न फसला होता.
- राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपअधीक्षक.
पिस्तूल बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न सुरू
पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. या अनुषंगाने पिस्तूल बनवणाऱ्या कारखान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ताब्यात घेतलेल्या आरोपींमार्फत या कनेक्शनपर्यंत कसे पोहोचता येईल यानुसार तपास सुरू आहे.
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.