आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावन विभागाकडून मनुष्यबळ तोकडे असल्याचे कारण पुढे करून पेट्रोलिंग होत नसल्यामुळे जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारी होण्याचे प्रकार वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच मांडुळाची तस्करी झाल्याचाही प्रकार उघड झाला. वर्षभरात वन विभागाकडून बारा शिकाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जंगलात मोर, लांडोराचे अवशेष सापडले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक आहे. जालना जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र १०१.१८ चौ. किमी आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते १.३१% येते. जिल्ह्याच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त ०.१२ टक्के येते. यावरून जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र खूपच कमी असल्याचे दिसून येते. दरम्यान, या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची
संख्या कमी आहे. परंतु, बिबट्या, लांडगे या वन्यप्राण्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे हरीण, काळविटांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे काही चोरून-लपून, काही ढाब्यांवर खाण्यासाठी मोर, हरणांचे मांसही मिळत असल्यामुळे या वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे.
जालन्याचे दोन विभाग : जालना जिल्ह्यातील वन विभागाचे उत्तर-दक्षिण असे दोन विभाग आहेत. या दोन विभागांसाठी स्वतंत्र वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांकडे वनसंपदा जतन राहण्यासाठीची जबाबदारी आहे. परंतु, शिकाऱ्यांकडून हरीण, मोर, लांडोर अशा वन्यप्राण्यांच्या शिकारी होत आहेत.
घोरपडीचीही शिकार
वन्यजीवांच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या वर्गवारीत संरक्षण दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात काही भागांमध्ये घोरपडीचीही शिकार होत असते. या घोरपडीची शिकार किंवा तस्करी करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. परंतु, जालना वन विभागाच्या पोलिसांनाही एकही कारवाई करता आलेली नाही.
वन्यप्राण्यांची संख्या
जिल्ह्यातील विविध वनांमध्ये वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांनी दिलेल्या माहितीनुसार हरीण, काळविटांची संख्या ५ हजारांच्या जवळपास आहे. मोरांची संख्याही ४ हजारांच्या जवळपास आहे. ओढे, नाल्या, खोल दऱ्या, निर्मनुष्य ठिकाणी या प्राण्यांची संख्या वाढत आहे.
१९२६ वर संपर्क साधा
कुठे वन्यप्राण्याची शिकार तसेच वन्यप्राणी विहिरीत पडला असेल, कुठे बिबट्या दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्यासाठी नागरिकांनी १९२६ या क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांना पकडले
जिल्ह्यात मोर, मांडूळ पकडणाऱ्या बारा कारवायांमध्ये आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. मनुष्यबळ तोकडे आहे. परंतु, जंगल परिसरात वारंवार पेट्रोलिंग करून अशा शिकाऱ्यांना पकडण्यासाठी नियमित कारवाया सुरूच असतात.
- पुष्पा पवार, सहायक उपवनसंरक्षक, जालना.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.