आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्रकसह त्यातील मुद्देमाल हडप करायचा म्हणून चालकाने घाटात लुटल्याची खोटी फिर्याद दिली. या खोट्या तक्रारीसाठी इतर तीन जणांनी मदत केली. तालुका पोलिसांनी खोलात जाऊन तपास करीत फिर्याद देणाऱ्या चालकास अन्य तिघांना निष्पन्न केले. ट्रकसह २५ लाखांचा मुद्देमाल हडप करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. दरम्यान, फिर्याद खोटी ठरू नये म्हणून वारंवार ज्या घाटात वाहनचालकांना लुटले जाते, लूटमारीसाठी बदनाम असलेल्या वाघ्रुळच्या घाटात दुचाकीहून आलेल्या चार जणांनी लुटले, अशी खोटी फिर्याद दिली होती. मोहंमद अजीम अन्वर (चालक, चांदगड, उत्तर प्रदेश), अशोक सदाशिव मिसाळ, गणेश राजाभाऊ मिरगे, विकास संपत मोरे अशी आरोपींची नावे आहेत.
जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाघ्रुळ घाटात ट्रक अडवून मारहाण करीत मुद्देमाल व ट्रक नेल्याची तक्रार मोहंमद अन्वर याने दिली होती. या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांनी पथके करून तपास सुरू केला. दरम्यान, तक्रारदार असलेल्या चालकाच्या संशयास्पद हालचाली असल्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. चालकाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मालकाला विश्वास वाटावा म्हणून ही फिर्याद दिल्याची कबुली दिली. यासाठी इतर तीन जणांनीही कशी मदत केली याबाबतचीही माहिती दिली. उर्वरित तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा उघड केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, संदीप उगले, संदीप बेराड, वसंत धस, रवी मेहत्रे, प्रतापसिंग जारवाल, अशोक राऊत आदींनी केली आहे.
घाटात आता रस्ता चांगला: वाघ्रुळ घाटात काही वर्षांपूर्वी वारंवार लूटमारीच्या घटना होत होत्या. परंतु, एक वर्षापासून आता हा रस्ता चांगला झाला आहे. पूर्वी रस्ता चांगला नसल्यामुळे वाहने या ठिकाणाहून नेत असताना अगदी हळूने न्यावी लागत होती. परंतु, आता रस्ता चांगला झाल्याने वाहने सुसाट जात आहेत. आरोपींनी या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या असल्यामुळे पोलिसांना संशय येऊ नये म्हणून हा घाट निवडला होता. परंतु, तालुका पोलिसांनी सखोल तपास केल्यामुळे हा गुन्हा उघड झाला.
फिर्यादीवर होता संशय
फिर्याद देण्यापासूनच तपास सुरू होता. फिर्यादी संशयित असल्याने पथके स्थापन करून हा गुन्हा उघड केला आहे. मालकाची व पोलिसांचीही दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी चांगला प्लॅन आखला होता.
- मारुती खेडकर, पोलिस निरीक्षक, तालुका जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.