आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत उपचार सुविधा:जिल्हा रुग्णालयामध्ये सहा महिन्यांत चारशे शस्त्रक्रिया, टोटल हिप रिप्लेसमेंटही यशस्वी

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयात मॉड्युलार जनरल व ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर उभारल्या पासून आतापर्यंत सहा महिन्यात ४०० जणांवर जणांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याठिकाणी प्रथमच एका टोटल हिप रिप्लेसमेंट ची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गरीबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा रुग्णालयात सर्व उपचार मोफत होत असल्यामुळे रुग्णांचा ओढा वाढला असून दैनंदिन ओपीडी ८०० वर गेली आहे.

कोरोना काळात जवळपास दोन वर्षे शस्त्रक्रिया गृह बंद ठेवण्यात आले होते. मात्र, याच काळात जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यासाठी शासनाकडून आठ कोटींचा निधी प्राप्त झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे हाती घेण्यात आली. यातच रुग्णांना अद्यावत उपचार सुविधा मिळाव्यात, असाध्य शस्त्रक्रियाही जिल्हा रुग्णालयात व्हाव्यात, यासाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले. तत्कालीन आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते १३ जून २०२२ रोजी याचे लोकार्पण केल्यानंतर १० दिवसांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया सुरू झाल्या. २३ जून ते २३ नोव्हेंबर या सहा महिन्यात याठिकाणी छोट्या-मोठ्या मिळून ४०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याठिकाणी सर्व अद्यावत यंत्रसामग्री असल्यामुळे एकाही रुग्णास जंतूसंसर्ग किंवा तत्सम समस्या आली नसल्याचे डॉक्टर सांगतात.

दोन भूलतज्ज्ञ, १२ शल्यचिकित्सक : जिल्हा रुग्णालयात २ जनरल सर्जन, ४ ऑर्थोपेडिक सर्जन, ४ कान, नाक, घसा व २ दोन भूलतज्ज्ञ आहेत. यातील १ जनरल सर्जन, १ कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि १ भूलतज्ज्ञ यांची नेमणूक राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केलेली असून उर्वरित ८ जण नियमित आहेत.

मॉड्युलार ऑपरेशन थिएटरमुळे अनेकविध शस्त्रक्रिया
जिल्हा रुग्णालयातील मॉड्युलार ऑपरेशन थिएटरमुळे छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. अद्ययावत सुविधेमुळे रुग्णांना जंतुसंसर्ग होत नाही, रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना आराम मिळतो. यामुळे गरजू रुग्णांनी या मोफत उपचार सुविधेचा लाभ घ्यावा. -डॉ. प्रताप घोडके, प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक, जालना

मॉड्युलार ऑपरेशन थिएटरमध्ये सेंट्रल सिस्टिम
रुग्णास संसर्ग बाधा होऊ नये यासाठी शस्त्रक्रियागृहाला स्टेनलेस स्टीलचे आवरण लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, ऑक्सिजन आदी सुविधांबरोबरच तीन प्रकारचे फिल्टर बसवण्यात आलेले आहे. तसेच ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियागृहातही अत्याधुनिक सियाम मशीन्स, फ्रॅक्चर टेबल उपलब्ध आहे.

टोटल हिपटॉप सर्जरीचे कौतुक
डॉ. उमेश जाधव, डॉ. प्रवीण मरकड, डॉ. विठ्ठल शेळके, डॉ. सुरेश मुलगीर या तज्ज्ञ डॉक्टरांनी एका रुग्णाची टोटल हिपटॉप सर्जरी यशस्वी केली. जिल्हा शल्यचिकित्सकांसह रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांचे कौतुक केले होते. खासगी रुग्णालयात दीड ते तीन लाखांपर्यंत यासाठी खर्च येतो.

बातम्या आणखी आहेत...