आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे राजकारण:जायकवाडीत चार पंप; मात्र जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने जालना शहरात पाणीटंचाई

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्यावरून जालन्यात सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. जालनेकरांना १० ते १२ दिवसांआड पाणी मिळत असल्याचे सांगत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जालन्यात बुधवारी जलआक्रोश मोर्चा काढला. अंतर्गत जलवाहिनी होऊनही जालनेकरांना आठवड्यातून दोन वेळा पाणी येत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. जालनेकरांना पाणी का मिळत नाही. या समस्येवर उपाययोजना काय असू शकते. याचा आढावा ‘दिव्य मराठी’ने भाजपच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर घेतला. तेव्हा त्यात अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या. जलवाहिनीचे आठ जलकुंभ तयार झाले असून सात जलकुंभांची चाचणीही झाली. जलकुंभातील पाणी वॉर्डांत जाते की नाही, याची चाचपणी सुरू आहे. हे काम २०१६ पासून २४ महिन्यांतच पूर्ण होेणे गरजेचे होते. परंतु, कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे या कामाला चार वेळा मुदतवाढ मिळाली. दरम्यान, जायकवाडीतून पाणी ओढण्यासाठी चार पंप आहेत. परंतु, जालन्यात मोठ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र नसल्यामुळे दोन पंपांनीच पाणी ओढावे लागते. ३५ एमएलडी पाण्यावर दररोज जलशुद्धीकरण केंद्र झाल्याशिवाय जालनेकरांची टंचाई कमी होणार नसल्यामुळे याचा प्रस्ताव पालिका प्रशासन तयार करीत आहे.

चार ते सात दिवसांआड पाणी देण्यासाठी जालनेकरांना १२९ कोटींची अंतर्गत जलवाहिनी योजना केली आहे. २४ महिन्यांत हे काम करण्याची मुदत होती. परंतु, पाच वेळा कंत्राटदाराने मुदत वाढवून घेतली. नंतर निधीही वाढवून घेतला आहे. ही याेजना पूर्ण झाल्यानंतर चार ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे पालिकेच्या नियोजनात होते. दरम्यान, पालिकेच्या कागदोपत्री संपूर्ण ४१९.५१ किलोमीटर अंतर्गत जलवाहिनी अंथरल्याचे व आठ जलकुंभ झाल्याने १०० टक्के कामे झाल्याची नोंद झाली. परंतु, प्रत्यक्षात अजूनही अनेक वॉर्डांमध्ये पाणी गेले नसल्याची ओरड होत आहे.

कामाची सद्य:स्थिती
अंतर्गत जलवाहिनीचे आठ जलकुंभ तयार झाले आहेत. यात सात जलकुंभांची टेस्टिंग झाली आहे. वॉर्डात अंथरलेल्या जलवाहिनीला हे पाणी जाते काय, याची चाचपणी केली जात आहे. सध्या कुठे १० तर कुठे १५ दिवसाआंड पाणीपुरवठा होत आहे. १२९ कोटी रुपये कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत.

जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावाची तयारी
जालन्यात ६५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. तो प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवून नंतर त्याला मंजुरी मिळवून घेत काम केले जाणार आहे. परंतु, या प्रक्रियेला बहुतांश कालावधी उलटण्याची शक्यता आहे. नवीन जलकुंभांत दहा एमएलडी अतिरिक्त पाणी साठण्याला मदत होणार आहे.

घाणेवाडीतून रोज ६, तर जायकवाडीतून १६ एमएलडी पाणी
घाणेवाडीतून दररोज ६ तर जायकवाडीतून १६ एमएलडी असा २१ एमएलडी पाणीपुरवठा होतो. घाणेवाडीतून नवीन जालन्याला तर जायकवाडीतून जुन्या जालन्याला पाणीपुरवठा होतो. उशिराने होणारा पाणीपुरवठा जालनेकरांना लवकर होण्यासाठी अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणली आहे. यात नऊ जलकुंभांचे नियोजन असून अंतर्गत जलवाहिनीही शहरात अंथरण्यात आली आहे. सध्या सात जलकुंभांमध्ये पाणी साठवण्याची चाचणी घेतली. त्या जलकुंभांतून त्या परिसरात असणाऱ्या वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे. परंतु, ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जलकुंभ वाढूनही पाणी येण्याची सायकलिंग का कमी होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी, सभेतही मुद्दा उठवला
अंतर्गत पाणीपुरवठा योजना ही डिझाइनप्रमाणे तसेच वेळेत झाली नाही. याबाबत पालिका सभेत आवाज उठवला. तसेच काम अपूर्ण असताना, जलकुंभांची टेस्टिंग, वॉर्डातील जलवाहिनीतील जोडण्या बाकी असताना कंत्राटदाराला पूर्ण बिले अदा केली. याबाबत वकील नगरसेवकामार्फत तक्रारी केल्या आहेत.
- अशोक पांगारकर, गटनेता, भाजप.

नवीन जलशुद्धीकरण केंद्र असणे गरजेचे
जालनेकरांना कमी दिवसांनी पाणीपुरवठा होण्यासाठी शहरात ३५ एमएलडीचे जलशुद्धीकरण होणे गरजेचे आहे. पाणी ओढण्यासाठी पंप आहेत. परंतु, जास्तीचे पाणी ओढल्यानंतर त्यावर शुद्धीकरण करण्यासाठी गरज आहे. सध्या अंबड येथे जलशुद्धीकरण होते.
- राजेश बगळे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग

अपूर्ण कामे करीत आहोत
काही जलकुंभांची टेस्टिंग व जोडण्यांची कामे अपूर्ण आहेत. कंत्राटदाराला १०० टक्के निधी दिला नाही. कम्प्लिशन होण्याच्या अनुषंगाने काही निधी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त जलशुद्धीकरण केंद्र होण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी

बातम्या आणखी आहेत...