आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा पदविका कोर्स:यंदापासून विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिकवणार हिंदी

डॉ. शेखर मगर | औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाने यंदापासून एक अनोखा पदविका कोर्स सुरू केला आहे. ‘डिप्लोमा इन हिंदी फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स’ असे कोर्सचे नाव असून शिक्षणासाठी आलेल्या विदेशी विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. एक वर्ष आणि दोन सत्राच्या या अभ्यासक्रमाच्या सोमवार ते शुक्रवार दररोज दोन तासिका होतील. शंभर टक्के रोजगार देणाऱ्या ‘हिंदी अनुवाद’ पदविकेला मात्र भारतीय विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनी म्हणजेच १९६८ दरम्यान हिंदी विभागाची स्थापना झाली होती. विभागाला ५४ वर्षे झाली असून अनेक हिंदी साहित्यिक दिले आहेत. आतापर्यंत ४९५ विद्यार्थ्यांनी पीएचडी, तर ४२६ जणांनी एमफिल केले आहे. म्हणजेच ९२१ जणांनी हिंदी साहित्य, हिंदी नाटक, काव्यात संशोधन केले आहे. एवढी समृद्ध परंपरा असलेल्या या विभागाने या शैक्षणिक वर्षांपासून ‘विदेशी विद्यार्थ्यांसाठी हिंदी पदविका’ असा कोर्स सुरू केला आहे. बारावी किंवा समकक्ष उत्तीर्णांसाठी दोन सत्रांचा हा ३० प्रवेश क्षमता असलेला कोर्स आहे.

विशेष म्हणजे इंग्रजीतून हिंदी शिकवले जाणार असून ऑक्टोबरपासून तासिका सुरू होणार आहेत, तर शंभर टक्के रोजगाराभिमुख असलेल्या ‘हिंदी अनुवाद’ कोर्सचे हे विसावे वर्ष आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागात ‘हिंदी ऑफिसर’ अशी एक जागा असते. त्यासाठी हा कोर्स करणे अनिवार्य असते. ४० प्रवेश क्षमतेच्या या कोर्सचे अध्यापन सुटीच्या दिवशी अर्थात शनिवार, रविवारी सायंकाळी होईल. त्यामुळे शासकीय, खासगी सेवेतील पदवीधर चाकरमान्यांना प्रवेशाची संधी आहे. पदविकेत साहित्यिक, शासकीय, पत्रकारिता व सिनेमासाठी आवश्यक अनुवादाचे धडे दिले जाणार आहेत. इच्छुकांनी www.bamu.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

पुढील वर्षीपासून आरजेचा कोर्स सुरू करणार
पुढील वर्षीपासून आरजे अर्थात रेडिओ जॉकीचा कोर्स सुरू करणार आहोत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मान्यता दिली आहे. अभ्यासक्रम संरचनेची प्रक्रिया दिवाळीनंतर पूर्ण केली जाईल. विद्यार्थ्यांच्या फक्त हिंदी भाषेवरच नव्हे तर मराठी, इंग्रजी भाषांवरही संस्कार करण्याचे काम आरजे कोर्स करेल. सिनेमा, हिंदी पत्रकारिता, हिंदी साहित्याची रुची वाढवणारा हा कोर्स आहे. दोन वर्षांच्या एमए अभ्यासक्रमातही मोठे फेरबदल केले आहेत. फक्त हिंदी साहित्य नव्हे तर आता कौशल्यावर आधारित व रोजगारभिमुख एमएचा कोर्स केला आहे. - डॉ. भारती गोरे, हिंदी विभागप्रमुख.

बातम्या आणखी आहेत...