आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वी ची परिक्षा:आजपासून 368 केंद्रांवर इयत्ता दहावीची परीक्षा, कॉपीमुक्तीसाठी प्रत्येक केंद्रावर रनरचे बैठे पथक

जालना6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ होत असून पहिला पेपर मराठी विषयाचा आहे. १५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत ३६८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी एकूण ३० हजार ४८६ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. दरम्यान, इयत्ता बारावीच्या परीक्षेत काही ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यामुळे खबरदारी म्हणून दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर रनर हे बैठे पथक म्हणून बसवले जाणार आहे. शिवाय, भरारी पथकांचीही केंद्रावर नजर असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दहावीचा वर्ग असलेल्या १०० मुख्य तर २६८ उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे. सकाळी १०.३० ते २ व १०.३० ते १२.४५ अशी पेपरची वेळ असणार आहे. या केंद्रांवर पेपर, उत्तरपत्रिका व तत्सम साहित्याची ने-आण करण्यासाठी नेमलेल्या रनरला बैठ्या पथकात सहभागी करून घेण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या आदेशान्वये प्रत्येक केंद्रावर एका स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. यात केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर, पंचायत समिती कर्मचारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना नेमले आहे. हे सर्वजण परीक्षा कालावधीत संबंधित केंद्रात उपस्थित राहतील. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रांत परीक्षा असल्यास दोन्ही पेपरला स्वतंत्र पथके असतील.

काही गडबड झाल्यास थेट कारवाईचा इशारा
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडेल, यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी दिले आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर काही गडबड, गोंधळ झाल्यास संबंधितावर कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा पार पाडावी, असे आवाहन जि.प. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...