आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:भक्तिभाव परंपरेची जोपासणा करणारा हेलसचा गणेशोत्सव

प्रदीप देशमुख | मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कालौघात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असताना, मंठा तालुक्यातील हेलस येथील गणेशोत्सव मात्र आजही भक्ती भावाची आणि प्रबोधनाची अस्सल परंपरा जोपासताना दिसतो. या गावात १३४ वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना राबवली जाते. गणेशोत्सवात दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबतच नाटके आणि लळीत यासारखी अस्सल पारंपरिक लोककला प्रकार पाहायला मिळतात. या गावात ना गणपतीची स्थापना असते ना विसर्जन, ग्रामदैवत असलेल्या गणपतीच्या मंदिरातच हा उत्सव साजरा केला जातो.

मंठा शहराच्या पूर्वेला चार किलोमीटर अंतरावर हेलावंती नगरी अर्थात हेलस हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव वसलेले आहे. या गावात मारोतीची मंदिरे, हेमाडपंती महादेव मंदिर, कालिंका देवी मंदिर, गोंदेश्वर मंदिर, दत्तात्रय मंदिर यासारखी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. येथील शिल्पकलेला प्राचीन वारसा आहे. या गावात कोणत्याही ग्रामस्थांच्या घरी गणपतीची स्थापना होत नाही. तसेच अनंत चतुर्दशीला कोणत्याही प्रकारे श्रींचे विसर्जन केले जात नाही. या काळात गणपती मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू असतो. भाद्रपद पौर्णिमेला या ग्रंथाची सांगता केली जाते.

या निमित्ताने संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक महाप्रसादासाठी हेलसला आवर्जून हजेरी लावतात. येथील कढी भात आणि शिरा या प्रसादाची लज्जत काही वेगळीच असते. दिवसभर गावात पंगती सुरू असतात. सायंकाळी श्रींच्या मिरवणुकीला सुरुवात होते. पालखी मिरवणूक रात्रभर सुरू असते. या निमित्ताने तालुक्यासह परजिल्ह्यातून भजनी मंडळी सहभागी होतात. पालखी मिरवणुकीच्या उत्तरार्धात गवळण आणि भारूडे सादर केली जातात.यानिमित्ताने सगळा गाव रात्रभर जागा असतो. या उत्सवासाठी गावातील प्रत्येक घरच्या लेकीबाळी आवर्जून माहेरी येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. भल्या पहाटे दहीहंडी फोडून पालखी मिरवणुकीची आणि उत्सवाची सांगता होते.

अनेक भाविक नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी हेलस गावाला हजेरी लावतात. गौरी पूजनाच्या दरम्यान येथे लळीतासारखा अस्सल लोककला प्रकार आजही इतक्या वर्षानंतर पाहायला मिळतो. यातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले जाते. दिवसेंदिवस गणेश उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. कर्णकर्कश आवाजातील डीजेवर वाजणारी गाणी आणि त्या आवाजावर थिरकणारी पावले आणि धांगडधिंगा पाहायला मिळतो. अशा काळात हेलस गावाचा भक्तीभाव आणि प्रबोधनाची अस्सल परंपरा जोपासणारा गणेशोत्सव खरंच खूप आगळा वेगळा वाटतो.
सभागृहासाठी प्रस्ताव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील स्वच्छता, रस्त्याची डागडुजी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीने केली आहे. सिमेंट रस्ते करणे, भूमिगत नाली बांधकाम, हाय मस्ट दिवे आणि सांस्कृतिक सभागृहासाठीचा तीन कोटी ४१ लाख रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून, सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पांडुरंग खराबे, सरपंच हेलस.

बातम्या आणखी आहेत...