आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' घोषणेच्या गजरात विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाचे दहा दिवस संपल्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यात विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दहा दिवसांच्या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले. विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल, ताशे, डीजे आदींवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नृत्य केले. गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. दरम्यान, शेवटच्या दोन दिवशी विविध मंडळाकडून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मंठ्यात ‘शिवतांडव” ढोल-ताशांचे मुख्य आकर्षण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात मंठा येथे गणरायाला भक्तिपूर्ण निरोप देण्यात आला. जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने शहापूर येथील शिवतांडव ढोल-ताशा पथक बोलावण्यात आले होते. रात्री आठच्या वाजेच्या सुमारास विसर्जन शांततेत पार पडले. शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये मानाची पालखी अग्रभागी होती. मिरवणुकीच्या दरम्यान वरुण राजाने हजेरी लावली होती. सर्व गणेश भक्त पावसासह गुलालाने न्हाऊन निघाले. ढोल पथकामध्ये जवळपास शंभर वादकांचा सहभाग होता. ढोल, टोल, लेझीम, झांज व ताशांच्या एकसुरातील नादाने परिसरात चैतन्य पसरले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनीही ढोल ताशाच्या ठेक्यावर लेझीम खेळली. यावेळी गणेशभक्तासह भाविकांची आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या दोन वर्षापासून कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवावर निर्बंध आल्यामुळे सार्वजनिक मंडळाकडून गणेशाची स्थापना करण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र मोठा उत्साह पाहायला मिळाला. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवतांडव ढोल ताशा पथकाचे खास आकर्षण ठरले होते. हाती भगवा ध्वज घेऊन ढोल, टोल, लेझीम , झांज व ताशांच्या एकसुरातील नादाने परिसरात चैतन्य पसरले होते.या पथकाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, या पथकाला मिळालेल्या मानधनातून समाज कार्य केले जात असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

बैलगाडीतून मिरवणूक भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मागील दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी उत्साहात आणि शांततेत निरोप देण्यात आला. गावातील एका गणेश मंडळाने चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक काढल्याने ही बैलगाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पिंपळगाव रेणुकाई येथे आठ गणेश मंडळे स्थापन करण्यात आली होती. डीजेवर निर्बंध घालण्यात आल्याने गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यात दुपारी बारा वाजेपासून सुरुवात केली. गावातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील घराघरातील गणपती मिरवणूक ट्रॅक्टरमध्ये देण्यात आले. सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी पारध पोलिस ठाण्याचे प्रकाश सिनकर उपस्थित होते.

अंबडला प्रत्येक गणेश मंडळ अध्यक्षांचे स्वागत शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान महाराष्ट्र द्वारजवळ आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा फेटा बांधून आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला. या वेळी ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध गणेश मंडळाने ढोल, ताशा, झांज पथक, लेझीम पथकाद्वारे मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली. मिरवणुकी दरम्यान, पावसाचेही आगमन झाले. नगर परिषदेच्या विहिरीत सर्व मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या वेळी देविदास कुचे, दीपक ठाकूर, संदीप खरात, बाळासाहेब तायडे, रमेश शहाणे, शेख फेरोज, शाहुल खरात, नरेश बुंदेलखंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोकरदनला मिरवणूक शहरात श्री विसर्जन मिरवणूक शांततेत झाली.मिरवणुकीचे मुख्य आकर्षण हाेते सिद्धिविनायक गणेश ढोल ताशा पथकाचे. या पथकाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक वेशभूषा करून उत्कृष्ट पद्धतीने कालबद्ध ढोल ताशा वाजवून विसर्जन मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भोकरदन शहरात प्रथा परंपरेप्रमाणे श्री विसर्जनाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघाली. मुख्य मिरवणुकीमध्ये जुन्या भोकरदन शहरातील सहा गणेश मंडळे सहभागी झाली होती. संध्याकाळी सहा वाजता सर्व मंडळांचे गणपती आपापल्या मंडळापासून ते मार्गक्रमण करीत निघाले. डॉक्टर हेडगेवार चौकात आल्यानंतर आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते चौकात प्रथम आलेल्या गणपतीचे पूजन करून श्री विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे, राजाभाऊ देशमुख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महादूसिंग डोभाळ, पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंडे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर हेडगेवार चौकात गणपतीच्या मिरवणूक पोहोचल्या नंतर आमदार संतोष दानवे राजाभाऊ देशमुख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मादुसिंह महादू सिंह डोभाळ यांनी ढोल ताशे व झांज वाजून ढोल ताशा पथकातील वादकांचा व गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित केला. यावर्षी भोकरदन शहराच्या मुख्य मिरवणुकीमध्ये सहा गणेश मंडळे सहभागी झाली होती.

सिद्धिविनायक गणेश मंडळ लाल गडी छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ देशमुख गल्ली नवतरुण गणेश मंडळ पेशवे नगर, बाल गणेश मंडळ परदेशी गल्ली व गणेश मंडळ भाजप संपर्क कार्यालय भोकरदन यांनी ढोल ताशांच्या संचासह मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. दरम्यान, भोकरदन शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणेश फेस्टिव्हलच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी भोकरदन गणेश फेस्टिव्हलचे संतोष अन्नदाते, मादुसिंह ढोबाळ नारायणराव जीवरख रमेश बिरसोने यांची उपस्थिती होती. हेडगेवार चौकात जयेश प्रसाद मित्र मंडळाच्या वतीने भक्तांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...