आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग दिन साजरा:मनमंदिर प्रकल्पास ३ महिने पुरेल इतके किराणा सामान भेट

वडीगोद्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण आपल्या मातीचे, समाजाचे ॠण फेडण्यासाठी काहीतरी सामाजिक काम केले पाहिजे, या हेतूने वडीगोद्री येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पवार यांनी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील मनमंदिर प्रकल्पात किराणा साहित्यासह तीन महिने पुरेल असे जीवनावश्यक साहित्य भेट देऊन दिव्यांग दिन साजरा केला.

वडीगोद्री पासून जवळच असलेल्या धाकलगाव शिवारामध्ये जालना रोड जवळच हा प्रकल्प आहे. खरंतर समाजातील जे बेघर, मतिमंद, वेडसर, निराधार, इकडे तिकडे भटकंती करणारे जे निराधार आहेत यांच्यासाठी हा प्रकल्प एक आशेचा किरण ठरत आहे.

गेल्या सहा महिन्यापासून ही जबाबदारी माधव पवार, सारिका पवार या दाम्पत्यांनी. आपल्या अर्धा एकर शेतीत मनमंदिर या नावाने या प्रकल्पाची स्थापना करून समाजाने, जवळच्या नात्यातील लोकांनीही कायमस्वरूपी उपेक्षित केलेल्या लोकांना हे दाम्पत्य रात्रंदिवस तन मन धन अर्पण करून त्यांना सेवा देण्याचे पवित्र काम करत आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी केलेला सेवाभाव काय असतो हे प्रत्यक्षात या मनमंदिर प्रकल्पामध्ये या दांपत्याकडून आज पाहायला मिळतो. या प्रकल्पामध्ये सध्या १२ जण आहेत. समाजामध्ये माणसांची संख्या भरपूर झालेली आहे. मात्र समाजामध्ये जे अंध, अपंग, अनाथ, निराधार, वृद्ध, मतिमंद आहेत अशा लोकांची जो सेवा करतो तो खऱ्या अर्थाने माणूस असतो. असे पवार म्हणाले. अण्णासाहेब पवार हे दर दिवाळीला ते अनाथ मुलांच्या प्रकल्पावर जाऊन त्यांची दिवाळी गोड करूनच ते दिवाळीचा सण साजरा करतात.

शिवाय वडीगोद्री येथील तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरुदेव आश्रम शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी दरवर्षी त्यांचा सिंहाचा वाटा असतो. गेवराई तालुक्यातील उमापूर या ठिकाणी धान्य बँकेच्या माध्यमातून एक घास गरजवंतांना देण्यासाठी ही ते सतत अग्रभागी असतात. ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन होय. खऱ्या अर्थाने समाजातील दिव्यांग बांधवांचा या दिवशी यथोचित सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, या अनुषंगाने पवार यांनी धाकलगाव येथील मनमंदीर प्रकल्पात ६० किलो गहू, तांदूळ, १५ किलो तेलाचा डबा, दहा साड्या, सात पराती, प्लेटा, अत्यावश्यक असणारा तीन महिने पुरेल इतका किराणा सामान भेट म्हणून दिला.

बातम्या आणखी आहेत...