आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार पेठ:हरभरा खरेदीला 18 जूनपर्यंत मुदत; बारदान्याच्या तुटवड्यामुळे केंद्रावर वाहनांच्या रांगा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हमीभावाने हरभरा खरेदीस नाफेडकडून येत्या १८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, मात्र पुरेसा बारदाना उपलब्ध न केल्यामुळे खरेदी बंद राहत आहेत. यामुळे खरेदी केंद्रावर ट्रॅक्टर, टेम्पो आदी मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. एकीकडे खरीपपूर्व हंगामाची कामे तर दुसरीकडे हरभरा विक्री केंद्रावरील बारदान्याची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हरभरा उत्पादकांकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना ५ हजार २३० रुपये हमीभाव मिळावा यासाठी शासनाने १६ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्ह्यात नाफेडची ११ खरेदी केंद्रे सुरू केली. सुरुवातीला २९ मे २०२२ पर्यंत खरेदी केंद्रे सुरू करण्यास मुदत होती. त्यामुळे या ठिकाणी हरभरा विक्रीसाठी १५ हजार २९१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ३८२ शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे संदेश पाठवण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी आणला. मात्र, २९ मेची मुदत संपल्याने तब्बल २ हजार शेतकऱ्यांचा हरभरा शिल्लक राहिला. यामुळे हरभरा खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली, तर लोकप्रतिनिधींनीही सरकारकडे शेतकऱ्यांची बाजू लावून धरली.

यामुळे येत्या १८ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली खरी, मात्र पुरेसा बारदाना उपलब्ध नसल्यामुळे सुरुवातीचे दोन दिवस खरेदी केंद्रांवर अत्यल्प खरेदी झाली. सर्वाधिक खरेदी जालना येथील केंद्रावर होत असतानासुद्धा फक्त २ हजार पोती मिळाली. ते सोमवार, मंगळवार व बुधवारी दुपारपर्यंतच भरले, यामुळे पुन्हा बारदान्याची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, बारदाना येईपर्यंत प्रतीक्षा
जालना येथील बाजार समिती आवारातील खरेदी केंद्र बारदान्याअभावी बंद राहत असल्यामुळे इतर ठिकाणच्या केंद्रांवर हरभरा विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक व नाफेडच्या व्यवस्थापकांकडे केली. मात्र, ज्या केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केली, त्याच ठिकाणी विक्री करता येईल, असा नियम असल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. यामुळे बारदाना येईपर्यंत प्रतीक्षा करणे एवढेच शेतकऱ्यांच्या हाती राहिले आहे.

बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे नाफेडला पसंती
जालना येथील मोंढ्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ४२०० रुपये भाव मिळत आहे. नाफेडकडून ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. बाजारभावापेक्षा किमान १ हजार रुपये अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा नाफेडच्या खरेदी केंद्राकडे अधिक आहे. काही जण नाइलाजास्तव मोंढ्यात मिळेल त्या भावात हरभरा विक्री करत आहेत.

बारदाना उपलब्धतेसाठी प्रयत्नशील आहोत
जिल्ह्यात नाफेडची एकूण ११ खरेदी केंद्रे असून ३१ मेपर्यंत १३ हजार ४६५ शेतकऱ्यांच्या २ लाख २ हजार ११ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली. १ लाख ५८ हजार क्विंटलचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तसेच १९०९ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे अजून बाकी असून बारदाना उपलब्धतेसाठी प्रयत्नशील आहोत.
राजेश हेमके, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जालना

बातम्या आणखी आहेत...