आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेमुदत संप:अर्धा किमी लांब मोर्चाने दणाणले शहर, घाटीतील चार‎ ऑपरेशन ढकलले पुढे, निम्म्या शिक्षकांवरच शाळा सुरू‎

जालना‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"एकच मिशन - जुनी पेन्शन'' ही घोषणा देत राज्य‎ शासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप‎ पुकारला आहे. जिल्ह्यातील विविध ५२ संघटनांनी या‎ संपाला पाठिंबा दिला. संपाच्या पहिल्याच दिवशी गांधी‎ चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎ काढण्यात आला. संपात जिल्ह्यातील जवळपास सहा‎ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. दुसरीकडे‎ कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हा शासकीय‎ रुग्णालयातील नियोजित ऑपरेशन पुढे ढकलण्यात‎ आले आहेत, तर जिल्हा परिषदेच्या शाळा निम्म्या‎ शिक्षकांवरच आल्या आहेत. तहसील आणि‎ जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कामेही या‎ संपामुळे ठप्प झाली.‎ जिल्‍ह्यातील सर्व सरकारी-निमसरकारी,‎ शिक्षक-शिक्षकेतर, नगरपालिका, नगर परिषदा,‎ नगरपंचायती कर्मचारी यांनी या संपाला पाठिंबा दिला‎ आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी महात्‍मा‎ गांधी चमन ते जिल्‍हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा‎ काढण्‍यात आला. या मोर्चात कर्मचारी,शिक्षक मोठ्या‎ संख्येने सहभागी झाले होते. एकच मिशन-जुनी पेन्शन‎ या मागणीच्या टोप्या आणि फलक लक्ष वेधून घेत होते.‎

मोर्चा जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात आल्‍यानंतर‎ त्याचे रूपांतर सभेत झाले. या वेळी राजेंद्र शिंदे यांची‎ कन्‍या क्रांती राजेंद्र शिंदे हिच्‍या भाषणाने सुरुवात झाली.‎ क्रांतीने शासनास उद्देशून जुनी पेन्‍शन लागू‎ करण्‍याबाबत मनोगत व्‍यक्‍त केले. तसेच या कार्यक्रमात‎ मृत एनपीएसधारक शिक्षक यांचे वडील कायंदे यांनी‎ त्‍यांच्‍या शिक्षक मुलाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांचे कुटुंबाची होत‎ असलेले हाल कथन केले. त्यानंतर सुरेश सपकाळ,‎ शिवाजीराव कोरडे, गणेश कावळे, डी.बी.काळे रमेश‎ आंधळे, डॉ.रवींद्र काकडे, सचिन उगले, राम शेळके,‎ अशोक तोंडे व इतर संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी जुनी‎ पेन्‍शन लागू करण्‍याबाबत मनोगत व्‍यक्‍त केले.‎ राष्‍ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. संपाचे निवेदन‎ जिल्‍हाधिकारी जालना यांच्यामार्फत शासनास सादर‎ करण्‍यात आले.‎

पाणी व स्वच्छतेवर‎ परिणाम नाही‎
नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी‎ आणि पाणीपुरवठा विभागातील‎ कर्मचारी अद्याप या संपात सहभागी‎ झाले नाहीत. त्यांच्या संघटनांनी २८‎ मार्चपासून संपात सहभागी होण्याचा‎ निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या‎ तरी स्वच्छता आणि‎ पाणीपुरवठ्याच्या सेवेवर कोणताही‎ परिणाम झालेला नाही. विशेष‎ म्हणजे आज मंगळवार असल्याने‎ नगरपालिकेचे सर्व ४०० स्वच्छता‎ कर्मचारी साप्ताहिक सुटीवर होते.‎ उद्या ते कामावर हजर होणार‎ आहेत. मात्र मध्यवर्ती संघटनेकडून‎ सूचना आल्या तर हे कर्मचारीही‎ संपावर जाऊ शकतात, अशी‎ माहिती पालिका कर्मचारी‎ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.‎

शिक्षण विभागाचे २४२२‎ जण संपात सहभागी
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या‎ संपात सहभागी झाले आहेत.‎ संपामुळे बुधवारी जिल्हा परिषदेच्या‎ शाळांवरील शिक्षकांची संख्या‎ निम्यावरच राहणार असल्याचा‎ अंदाज शिक्षण विभागाने वर्तवला‎ आहे. यामध्ये शिक्षण विभागात ५‎ हजार ६१६ कर्मचारी असून २४२२‎ जण संपात सहभागी झाले. ३ हजार‎ १९४ कर्तव्यावर रुजू होते.‎

तातडीचे ऑपरेशन्स, आपत्कालीन सेवा सुरू‎
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी आणि परिचारिका‎ संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम‎ काही प्रमाणात तेथील कामकाजावर झाला आहे. त्यामुळे‎ येथील नियोजित ऑपरेशन्स पुढे ढकलण्यात आली‎ आहेत. मात्र तातडीचे ऑपरेशन्स आणि इतर आपत्कालीन‎ सेवा सुरू आहेत. त्यासाठी शिकाऊ नर्स आणि कंत्राटी‎ कर्मचारी यांची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा‎ शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले यांनी सांगितले.‎

यह अंदर की बात है,पुलिस तुम्हारे साथ है‎
न्यायालयातील कर्मचारी आणि पोलीस दलातील‎ कर्मचारी यांना संपात सहभागी होता येत नाही. तरीही‎ त्यांनी या संपात आपला सहभाग असावा म्हणून‎ वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद दिला. न्यायालयाच्या ''क''‎ संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम‎ केले. तर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमावर‎ ''यहअंदर की बात है, पुलिस तुम्हारे साथ है'' अशा‎ आशयाचे संदेश पाठवून या संपाला प्रतिसाद दिला.‎

बातम्या आणखी आहेत...