आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:अपेक्षा अन् वास्तविकता यातील फरकावर अवलंबून असतो आनंद, जालन्यात मानस फाउंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी लेखक अच्युत गोडबोले यांचे मत

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे सातत्याने पैसा, प्रसिद्धी आणि मी पुढे कसा जाईल यावर अधिक भर दिला जात आहे. यातून समाज प्रचंड अपेक्षा वाढवत चालला आहे. प्रत्यक्षात अपेक्षा आणि वास्तविकता यातील फरकावरच आनंद अवलंबून असतो, हे समजून घेत जीवन जगले पाहिजे, असे मत प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. जालना शहरातील नाव्हा चौकजवळील मानस हॉस्पिटलच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी मानस फाउंडेशनच्या उद्घटनानिमित्त आयोजित ‘मनातला मुसाफिर’ या विषयावर जालनेकरांशी संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबई येथील निवृत्त भारतीय नौसेना अधिकारी सर्जन कमोडोर सुनील गोयल तर प्रमुख पाहुणे म्हणून बालग्राम (गेवराई)चे संचालक संतोष गर्जे तसेच बेला गोयल, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेकर, डॉ. शीतल आंबेकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी यशस्वी उपचाराने व्यसनमुक्त झालेले शेतकरी दामोदर आवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गोडबोले म्हणाले, सिनेमागृहात, टीव्हीवर आपले आदर्श कोण आहेत तर सिनेमा, सिरियल, जाहिरातीमधल्या नट-नट्या. यापेक्षा चांगले आर्किटेक्ट, गणिततज्ज्ञ, वैज्ञानिक, शिक्षक, कृषितज्ज्ञ, कॉस्मालॉजिस्ट, स्पेस रिसर्च करणारे, चित्रकार यांच्या किती मुलाखती बघितल्या. हे आपण स्वत:ला विचारले पाहिजे. त्याऐवजी माणूस दुसऱ्यांशी तुलना करत असून यामुळे अस्वस्थ राहत आहे. स्वत:चे मूल्यमापन करताना मला किती लोक बघत आहेत, काय म्हणत आहेत, याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात किती काही मिळवलं तरी दुसरा कुणीतरी वर असतोच. यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मात्र, प्रयत्न करत राहावे, अधिकाधिक शिकावे, मानवतेवर प्रेम करावे, इतरांचे कसे बरे होईल याकडे लक्ष द्यावे तरच आनंद मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजची व्यवस्था आपल्याला सातत्याने स्पर्धा करायला शिकवते आहे. सहकार्यापेक्षा स्पर्धेला महत्त्व दिले जात आहे. यापेक्षा काहीही असो मिळून करावं, दोन मार्क याला अधिक मिळतील, त्याला कमी मिळतील मात्र अभ्यास मिळूनच करावा. काहीही करून पुढे जा, कसंही कर, कसंही करून अमेरिकेत जा असं सांगितलं जातंय, हे भयंकर आहे. अलीकडे तुम्ही कसे यशस्वी व्हाल, कसे जिंकाल यासाठी वेगवेगळी भाषणे दिली जात आहे. निम्म्या किमतीतील पुस्तकात हे सांगितले जात आहे. हे सांगणारी काही मंडळी फेलच असतात. मात्र, तरीही आपली काही माणसं गुरासारखी त्याकडे जातात. साधारणत: एक लाख लोकांमध्ये २० जणांना जॉब मिळतो हे वास्तव असल्याचेही ते म्हणाले.

नैराश्य हा जगातील वेगाने वाढणारा विकार, सावध व्हा : सध्या मनोविकाराचे प्रमाण साधारणपणे १७ टक्के आहे. माइल्ड ते सिव्हियर अशाप्रकारचे हे लोक आहेत. डब्ल्यएचओच्या मते, वर्ष २०२०-२५ पर्यंत नैराश्याचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. अर्थात चारपैकी एकाला ही समस्या भेडसावणार आहे. आताची जी जीवनशैली आहे, त्याच्याशी निगडीत मोबाइल, सोशल मीडियाचे लागलेले वेड आहे. सोशल मीडियावर लाइक किती मिळतात एवढंच नाही तर लाइक कमी मिळाल्या यातून काहींना नैराश्य येत आहे. याहीपुढे पोर्नोग्राफीचे व्यसन अत्यंत भयानक असून यामुळे समाज कुरतडला गेला आहे. दारू वगैरे हे व्यसन आहेच मात्र मोबाइलचे व्यसन प्रचंड वाढले आहे यामुळे वेळीच सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याप्रंसगी वैयक्तीक आयुष्यातील अनेक पैलूही त्यांनी उलगडले.

‘मनातला मुसाफिर’ या विषयावर जालनेकरांशी साधला संवाद
एका आजारी व्यक्तीमुळे कुटुंबाचे मानसिक संतुलन बिघडते

गोयल म्हणाले, मानसिक आजाराला समजून घेत उपचार केल्यास केवळ त्या व्यक्तीचे नव्हे तर कुटुबांचे कल्याण होऊ शकते. एका आजारी व्यक्तीमुळे कुटुंबाचे मानसिक संतुलन बिघडते. यामुळे मानसिक व्यक्तीला बरे करण्यासाठी मदत करा, त्याला बरे करून सामाजिक योगदान द्या. दरम्यान, संतोष गर्जे, विनोद जैतमहाल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रकाश अंबेकर, सूत्रसंचालन प्रा. सुहास सदावर्ते, पाहुण्यांचा परिचय डॉ. सुजाता देवरे यांनी करून दिला. अश्विनी कायंदे यांनी स्वागतगीत गायले तर डॉ. यशवंत सोनुने यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...