आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात द्राक्षांचा गोडवा पोहोचवणाऱ्या जालना जिल्ह्यातील कडवंची द्राक्ष हबला या आठवड्यात बदललेल्या वातावरणाचा फटका बसला आहे. येथील दीड हजार एकरवरील द्राक्षबागा पाणी उतरणे, फ्लोअरिंग, द्राक्ष काढणी या स्थितीत आहेत. ढगाळ अन् हलका पाऊस यामुळे द्राक्षांची गुणवत्ता घटण्याची शक्यता असल्याने एका एकरासाठी दिवसाला तीन हजार रुपयांचा फवारणी खर्च आला आहे. सात दिवसांत या द्राक्ष बागायतदारांना लाखोंचा खर्च आला आहे. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस सांगितल्याने द्राक्ष हबवर मोठे संकट येऊ शकते, असा धोका वर्तवला जात आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची येथील द्राक्षशेतीची आेळख जगभरात झालेली आहे. या ठिकाणाहून स्थानिक बाजारपेठेसह विदेशातही द्राक्ष निर्यात केले जातात. कडवंची या ठिकाणी मागील ३५ वर्षांपासून शेतकरी द्राक्षांची शेती करतात. या ठिकाणी एकूण १ हजार ८१० हेक्टर शेती असून ६०० हेक्टरवर आता द्राक्षबागा पसरल्या आहेत. या शिवारात कडवंची, अंभुरेवाडी, धारकल्याण, नाव्हा, नंदापूर, वडगाव वखारी आदी गावांचे शेतकरी द्राक्षबागेची शेती करतात.
जमीन, पीक आणि वातावरण याच्याबरेाबर शेतकरी मागील ३५ वर्षांपासून एकरूप झाला असून द्राक्षवेलांची स्थिती पाहून ते त्यावरील आजार सांगू शकतात इतका अनुभव त्यांना आला आहे.
या जोरावर येथील शेतकरी उपाययोजना करतात. या ठिकाणी होणाऱ्या उलाढालीसाठी वर्ष २०१२ मध्ये १२०० एकर द्राक्ष लागवड झालेली होती. या वेळी ४१ कोटी रुपयांचे मूल्यांकन झाल्याचा अहवाल कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून बाहेर आला होता.
द्राक्षबागेचे पहिले पीक ५० टक्केच आले : या वर्षी एकूण परिसरात द्राक्षबागेचे पहिले पीक ५० टक्केच आलेले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ५० टक्के बागा आजच्या स्थितीत फेल्युअर आहेत. पुढील काही दिवसांत पावसाचे संकट येत आहे. यामुळे अस्मानी संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे द्राक्ष बागायतदारांना या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे कडवंची येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
दर वर्षी अवकाळी पावसामुळे पिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. मात्र शासनाकडून तुटपुजी भरपाई मिळते. शासनाने नुकसानी प्रमाणे माेबदला देणे आवश्यक आहे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सात दिवसांत माेठे नुकसान
शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. यामुळे शेती पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम होत आहे. ढगाळ वातावरण, पावसाचे शिपकारे यामुळे मागच्या सात दिवसांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसाला फवारणी करावी लागत आहे. पुढच्या आठवड्यातही द्राक्षबागांवर पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. - चंद्रकांत क्षीरसागर, तज्ज्ञ द्राक्ष उत्पादक, कडवंची
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.