आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलगी पळून गेल्याने समाजात अपमान झाल्याची भावना निर्माण झाली अाणि वडील व काकाने मिळून सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (१७) या मुलीला झाडाला गळफास देऊन मारल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे १३ डिसेंबर घडली हाेती. दुपारी ३.३० वाजता झाडाला लटकवून गळफास दिला अन् सायंकाळी ५ वाजता घराच्या उंबरठ्यापासून ७० मीटर अंतरावर कुक्कुटपालन शेडच्या आडोशाला अंत्यविधी उरकला. चंदनझिरा पाेलिसांनी गुन्हा उघड केला.
पोलिसांनी घटनास्थळावरून अंत्यविधीची ४० किलो राख जप्त केली. गळफास दिलेली दोरीही अंत्यविधीत आरोपींनी जाळून टाकली हाेती. या प्रकारानंतर मारेकरी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे या दोन्ही संशयितांची वेगवेगळी चौकशी केली. यात दोघांनी खून व नंतर अंत्यविधी केल्याची कबुली दिली. दोघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गजाआड करण्यात आले.
मंदिरात लग्नाचे ठरले होते
सूर्यकला ही घराजवळून ४ किमी अंतरावरील शाळेत अकरावीत शिक्षण घेत होती. मुलगी पळून गेल्याचे म्हणत नातेवाइकातील एका मुलाशी तिचे लग्न लावून देण्याचे ठरले. यानुसार मंदिरात लग्न करण्याच्या दृष्टीने नातेवाइक तेथे आले. परंतु, मुलीच्या नावावर जमीन करण्याच्या मागणीने हे लग्न झाले नाही.
पोलिस कोठडीत आणखी मुद्दे येतील समोर
चंदनझिरा ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश झलवार म्हणाले की, संशयित दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलीचा खून करण्यात, परस्पर अंत्यविधी करण्यात अजून कोण सहभागी आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे. पोलिस कोठडीमध्ये आणखी काही मुद्दे समोर येतील. या खुनात संपूर्ण कुटुंबाचाच सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.