आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''ह्यांनी सांगितलेले खरेच आहे, आमच्या चेहऱ्यावरील चिंता त्यांना दिसत होती. त्यांना जशी कुटुंबीयांची चिंता होती तसेच ते चिंतेत असले की आम्हा कुटुंबीयांनाही त्यांची चिंता वाटायची. हा निर्णय घेतल्याने त्यांना एक सहारा मिळाला आहे. आता ते निश्चिंत झाले तर आम्हा कुटुंबीयांना त्यापेक्षा मोठा कोणताच आनंद असू शकत नाही अशा शब्दात शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले अर्जुन खोतकर यांनी भावना व्यक्त केल्या.
पती म्हणतात ते बरोबरच
''मी घरात आलो की मला कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायची. या परिस्थितीत निर्णय घेणे क्रमप्राप्त होते, त्यामुळेच आपण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आहे.'' असे माझ्या पतींनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते खरेच आहे असेही सीमा खोतकर यांनी स्पष्ट केले.
लग्न झाले तेव्हा आमदार
सीमा खोतकर म्हणाल्या, अर्जुन खोतकर गेली 40 वर्षे शिवसैनिक म्हणून काम करीत आहेत. माझे लग्न झाले तेव्हा ते आमदार होते. काेरोनाकाळातील काही दिवस सोडले तर 40 वर्षांत त्यांनी संपूर्ण दिवस कुटुंबाला दिला असे मला तरी कधी आठवत नाही.
त्यांना वेळच नव्हता
सीमा खोतकर म्हणाल्या, माझे माहेर पैठण, आमच्याकडे मुलींचा साखरपुडा झाला की नवरा मुलगा भावी वधूला घेऊन ज्ञानेश्वर उद्यान, नाथसागर परिसरात दुचाकीवर फिरवून आणायचा. आपणही आपल्या भावी पतीसोबत असाच फेरफटका मारावा असे मलाही वाटायचे. परंतु, ह्यांना त्यासाठी कधी वेळ मिळाला नाही. शाखा उद्घाटने, बैठका, दौरे यातच ते बिझी असायचे. लग्नापूर्वीच ते आमदार होते. त्यामुळे त्यांचे हे बिझी असणे मी समजून घेतले. लग्नापूर्वी जालना जिल्ह्यापुरतेच त्यांचे काम मर्यादित होते. नंतरच्या काळात मराठवाडा आणि मंत्री असताना संपूर्ण राज्यात त्यांचे दौरे असत.
फोन पीएकडे नव्हे स्वतःकडेच
सीमा खोतकर म्हणाल्या, आपला स्वत:चा फोन ते कधीही पी.ए. किंवा ड्रायव्हरकडे देत नाहीत. प्रत्येक फोन ते स्वत: घ्यायचे करतात. अडचण सांगणाऱ्या प्रत्येकाशी ते बोलतात आणि त्याचे काम व्हावे म्हणून ज्या अधिकाऱ्यास फोन करायचा आहे, तिथे फोन करतात. दिवसभरात असे किती फोन येत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने पक्ष, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यासाठी झोकून दिले आहे.
शिवसेना ध्यास अन् श्वास
सलग 40 वर्षे त्यांचा ध्यास आणि श्वास शिवसेना हाच राहिला आहे. त्यामुळे आता पक्ष सोडत असताना त्यांना किती वेदना होत असतील माझ्याशिवाय इतर कुणीही समजू शकत नाही. याच वेदनेतून शुक्रवारी रात्रभर ते झोपू शकले नाहीत. परंतु, त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि पुढे सगळं सुरळीत होईल. ह्यांना कुटुंबीयांची चिंता वाटणार नाही आणि कुटुंबीयांना त्यांची चिंता वाटणार नाही, असा मला विश्वास आहे.
ते आशीर्वाद आजही आठवतात- खोतकर
तुमच्या लग्नाला येता आले नाही अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलून दाखवली होती. तेव्हा आम्ही त्यांना आमच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. लग्नानंतर साधारणत: दीड-दोन वर्षांनी ते जालना येथे मराठा बिल्डिंगला आमच्या घरी आले. मी फक्त 5-10 मिनिटे थांबेन असे ते येण्यापूर्वी म्हणाले होते. मात्र आमच्या घरी ते तब्बल तासभर थांबले होते. माँसाहेब, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्यासोबत होते. आमचे भले मोठे एकत्रित कुटुंब पाहून त्यांनी सर्वांचे कौतुक केले व आशीर्वाद दिले. आज हे शिवसेना पक्ष सोडत असताना हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे.
‘जय महाराष्ट्र’ म्हणताना खोतकरांच्या डोळ्यात अश्रू
‘गेल्या 40 वर्षांपासून मी सच्चा शिवसैनिक आहे, परंतु सध्या मी आणि माझे कुटुंब ज्या परिस्थितीतून जात आहे ते मी पाहू शकत नाही. घरी आलो की मला चिंतेत असलेले कुटुंब दिसते. हीच गोष्ट मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. पत्रकार परिषदेत ही माहिती देताना खोतकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
ईडीचा उल्लेखच केला नाही
अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या आठवडाभरापासून सुरू होती. खोतकर यांनी मात्र आपला निर्णय जालना येथे जाहीर करू, असे सुरुवातीपासूनच सांगितले होते. त्यानुसार ते शुक्रवारी सायंकाळी जालन्यात आले. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर केला. खोतकर यांच्याशी संबंधित रामनगर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याच कारणामुळे खोतकर काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पत्रकार परिषदेत खोतकर यांनी एकदाही ईडीचा उल्लेख केला नाही. इतर आमदार आणि नेते शिवसेनेेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली, परंतु खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याशी बोलून हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
ठाकरेंना केला काॅल
शनिवारी सकाळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. आपले कुटुंब सध्या ज्या अडचणीतून जाते आहे त्यातून काही निर्णय घ्यावे लागतील, असे खोतकर यांनी ठाकरे यांना कळवले. पत्रकार परिषदेस शिवसैनिक आणि खोतकर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
मी ‘सहारा’ शोधला
अर्जुन खोतकर म्हणाले, ‘जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच माझ्या मागे हे शुक्लकाष्ठ लागले. हा कारखाना तापडियांनी वर्ष 2012 मध्ये 42 कोटी रुपयांत विकत घेतला. त्यानंतर अजित सीड्सने माझ्या मध्यस्थीने तो 44 कोटींत विकत घेतला. यातील 75 टक्के रक्कम त्यांनी स्वतः दिली. त्यामुळे कारखाना त्यांच्या नावे झाला. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही कारखान्यात 7 कोटींची गुंतवणूक केली. यातील 5 कोटी रुपये देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले, तर उर्वरित रक्कम कुटुंबातून उभी केली. यात कोणताही गैरव्यवहार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या अडचणी वाढल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने या अडचणीतून बाहेर पडेल की नाही हा प्रश्न नाही, परंतु मी सहारा शोधला आहे. माझा आजपासून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.