आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूर येथे गुरुवारी अाध्यात्मिक शेतकरी मेळावा झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते २४५ गावांत हाती घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या जलतारा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.
कसे आहात, जालन्याच्या मातीत वेगळीच ऊर्जा आहे. २०१० मध्ये एका कार्यक्रमादरम्यान लोकांना स्वच्छ जालनाचे आवाहन केले होते. दुसऱ्या दिवशी हजारो हात शहराच्या स्वच्छतेसाठी सरसावले होते. २०१५ मध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत योजनेची सुरुवात खऱ्या अर्थाने २०१० मध्ये जालन्यात झाली होती. आज जलतारादेखील जालन्यातून सुरू होत आहे.
पूर्ण देशात तो पोहोचेल यात शंका नाही. शेतकऱ्यांचे अश्रू खूप खतरनाक असतात. डोळ्यात अश्रू घेऊन जो शेतकरी शेती करतो अन् त्यातून जे अन्न पिकवतो ते पिकवलेले अन्न खाणाराही आजारी पडतो. शेतकरी दुःखी असता कामा नये. कधीच कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या करायला नको. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी ५२० गावांमध्ये पदयात्रा केली. घराघरात जाऊन शेतकऱ्याला ‘तुम्ही एकटे नाहीत, चिंता करू नका. आपल्या मनात विश्वास कायम ठेवा. जीवनात सुख-दुःखे येत असतात. कोणाला नाही झाले दुःख? सगळ्यांना कधी ना कधी कठीण काळाचा सामना करावाच लागतो,’ असे समजावले. आज इथे आलात, आपले दुःख इथेच सोडून हसत हसत परत जा. मी प्रत्येक बाबीत पुढे जाईल आणि यशस्वी होईल या आत्मविश्वासाने आपण पुढे गेले पाहिजे. आपल्या सर्व चिंता इथेच सोडून एक नवे चिंतन घेऊन आपण जायला हवे. चिंता करू नका, चिंतन करा. मन प्रसन्न असेल तर शरीर अधिक मजबूत राहते. यासाठी ध्यान आवश्यक आहे.
भारत सरकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने ‘हर घर ध्यान’ची एक योजना आगामी काळात येऊ घातली आहे. ध्यान करा आणि मानसिक रोगांपासून मुक्त राहा. जीवन क्षणभंगुर आहे. हसतमुखाने आपण जगले पाहिजे. जीवनात रडत रडतच तर आलो आहोत, मात्र रडत रडत जायचे नाही असा संकल्प आपण करायला हवा. जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा आपण रडत होतो आणि लोक आनंदाने हसत होते. जेव्हा आपण या जगातून जाणार तेव्हा आपण हसत जावे आणि लोकांनी रडायला हवे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जीवन जगलो असे म्हणता येईल.
हीच खरी जीवन जगण्याची कला आहे. आपल्या गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी आपसातील मतभेद सामोपचाराने मिटवा. छोट्या छोट्या गोष्टीवरून अनेक खटले आज चालू आहेत. माणसाचे जीवन संपून जाते, मात्र कोर्टातल्या केसेस काही केल्या संपत नाहीत. गावातले तंटे गावातच सोडवले गेले पाहिजेत. वाद मिटवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका आपण घेतली पाहिजे. आपला गावाला आदर्श आणि श्रेष्ठ गाव बनवण्याचा संकल्प करा. नैसर्गिक शेती करा, स्वदेशी वस्तूंचा वापर करा. भारताला एक बाजारपेठ म्हणून जग पाहते. भारताची ही ओळख बदलून उत्पादक आणि निर्यातदार अशी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपण कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. अध्यात्म, योग, उद्योग आणि निष्ठा यांच्या माध्यमातून जीवनाला समजसेवेशी जोडून चालल्यास जीवन निश्चित एक उत्सव होईल. शब्दांंकन : आशिष गारकर, परतूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.