आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कही खुशी कही गम:जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; मका, बाजरी, ऊस, कपाशीचे पीक भुईसपाट

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून रविवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत, तर काही भागात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून विहिरी, कूपनलिकांमध्ये मुबलक पाणी आले आहे. मात्र, दुसरीकडे उभी असलेली खरिपातील मका, बाजरी, ऊस, कपाशी आदी पिके वादळात भुईसपाट झाली असून ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जालना शहरासह तालुक्यातील इंदेवाडी, कुंबेफळ, सिरसवाडी, दरेगाव, आंतरवाला, रेवगाव, सामनगाव, गोलापांगरी, बठाण, वडगाव, बेथलम, रोहनवाडी, सिंधी काळेगाव, उटवद शिवारात जोरदार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले असून सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. जालन्यात आठवडी बाजार दुपारी १२ वाजेदरम्यान पावसाला सुरुवात झाल्यामुळे भाजी, फळे, किराणा आदी साहित्य विक्रेत्यांसह खरेदीदारांची चांगलीच धांदल उडाली. यामुळे काहींनी छत्रीचा आधार घेतला तर काही जण नगरपालिका, जिल्हा परिषद, डायट तसेच खासगी इमारतीत जाऊन थांबले होते. तब्बल १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कमबॅक केल्यामुळे सुरुवातीला शेतकरी सुखावले होते, मात्र याच पावसाने आता उग्ररूप धारण केले.

अपर दुधना प्रकल्पात जलसाठा अर्ध्यावर बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील अपर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली असून प्रकल्पात निम्मा पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प भरल्यास तालुक्यातील बहुतांश पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच औरंगाबाद तालुक्यातून वाहत येणाऱ्या लहुकी नदीला रविवारी पहिल्यांदा पूर आला. यामुळे बदनापूर तालुक्यातील कडेगाव, वरुडी, बाजार वाहेगाव, चिकनगावमार्गे वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती.

प्रातिनिधिक नुकसान असे
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील बाळा बोरमळे, प्रवीण गांधिले, श्रीरंग बेंडे, नजीर खान, अमरजित धनावत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मका पीक आडवे झाले आहे. वडोदतांगडा येथील दादा बर्डे यांच्या शेतातील सौरऊर्जेच्या पॅनलची मोडतोड झाली असून नाना सपकाळ यांचा ऊस आडवा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...