आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मदतीकडे डोळे:सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अतिवृष्टीने 4 लाख हेक्टरचे नुकसान, 6 लाख शेतकरी बाधित

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा जुलै व ऑगस्टदरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे जालना जिल्ह्यातील ६ हजार ८९८ शेतकऱ्यांचे २ हजार ३११ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यापोटी शासनाकडून प्राप्त ३७१ कोटी ८४ लाख रुपयांचे अनुदान वितरण सुरू असतानाच पावसाने पुन्हा थैमान घातले. ऑक्टोबरमध्ये ऐन सोंगणी, मळणीला आलेले पीक जमीनदोस्त झाले. यात तब्बल ४ लाख २४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५ लाख ९८ हजार ६९६ शेतकरी बाधित झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवला आहे.

पहिल्या टप्प्यात भोकरदन, परतूर व मंठा तालुक्यात नुकसान झाले. मात्र, त्यानंतर नुकसानीची व्याप्ती वाढत गेली व आठही तालुक्यांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका, तूर यासह मोसंबी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. जिरायतीसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपयांची मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची अट टाकली. यात अल्पभूधारकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बहुभूधारकांना मात्र नुकसान पचवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

यातही स्थळपाहणी पंचनामे, प्राथमिक अहवाल, अंतिम अहवाल ही सरकारी कार्यवाही करण्यात १५ ते ३० दिवसांचा अवधी गेला. सुरुवातीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे अनुदान वितरण सुरू असताना ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होऊन उरलेल्या पिकांचीही माती झाली. बाधित क्षेत्र व नुकसानीची तीव्रता अधिक असल्यामुळे पिकांचे पंचनामे करण्यात तब्बल महिना गेला असून १ नोव्हेंबर रोजी कुठे शासनाला अहवाल पाठवण्यात आला आहे.

मदतीचा निर्णय शासन घेईल ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिके व फळपिकांचे जे नुकसान झालेल्या त्याचे पंचनामे करून एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवला आहे. यात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या विविध पिकांचा समावेश आहे. शासनाकडून मदत मिळाल्यावर शेतकऱ्यांना अदा केली जाईल. - केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना

नुकसान भरपाई तत्काळ द्या खरिपातील सर्वच पिके वाया गेली असून अजूनही शेतात चिखल आहे. पेरणीपूर्व मशागत, बी-बियाणे, खते, औषधी फवारणी, कुळवणी, सोंगणी अशा प्रत्येक टप्प्यावरील शेतकऱ्यांचे श्रम वाया गेले आहेत. हाती काहीच उरले नाही, यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी हा गंभीर प्रश्न आहे. याचा विचार करून शासनाने तात्काळ भरीव मदत द्यावी. - माधव पवार, शेतकरी, सामनगाव.

बातम्या आणखी आहेत...