आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहारदार कविता:किडकी मन जाळणार हाय, तेच कसे अंध हाय, तेच कसं..; अंध कवींनी एकापेक्षा एक बहारदार कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“किडकी मन जाळणार हाय...तेच कसे अंध हाय, हे मनामनांत पेरणारा हाय...! “ दृष्टिहीनांना भोवताली मिळणारी सापत्न वागणूक, वाट्याला येणारे दुःख, वेदना पचवून लढण्याचे बळ, जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच सामाजिक विडंबन, वास्तवातले प्रेम, प्रेमवीरांच्या भावना, कोरोनाची गंमत अशा सर्वस्पर्शी कवितांद्वारे अंध कवींनी उन्हाळ्यातली संध्याकाळ तजेलदार केली.

गुरू गणेश दृष्टिहीन विद्यालयात राष्ट्रीय दृष्टिहीन संघातर्फे आयोजित ब्रेल जागृती वाचक मेळाव्यात शनिवारी सायंकाळी भाव कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “काव्यसंध्येत’ कवी श्रीकांत गायकवाड, प्रदीप इक्कर यांच्यासह अंध कवींनी एकापेक्षा एक बहारदार कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

निवेदक मनोज आहेर यांनी प्रारंभी पद्यातून निर्माण झालेल्या रामायण, महाभारत या पहिल्या साहित्याने कवितेचा भारतमातेची जुळलेला संसार, भोवतालचे जग ज्ञानेंद्रियांनी शोषून घेतल्यावर प्रतिबिंबित होणारी कविता असे महत्त्व सांगितले. चैत्र झाडांचा सोयरा, येतो मुऱ्हाळी होऊन, कंठ सुटलेल्या रानाला, मृगाची ओढ” तप्त उन्हाळ्यात शेत शिवार, रानातील सचित्र वर्णन प्रदीप इक्कर यांनी मांडले. अर्धवट राहणारी जीवनाची प्रश्नपत्रिका यावर आधारित मधुकर सूर्यवंशी यांनी “विरान हे जीवनाचे महाविद्यालय, कोणास कळणार आहे,” या रचनेतून आयुष्याच्या गणिताची उकल केली.

रानावनात कष्ट करणाऱ्या माय माउलीचे वर्णन कवी श्रीकांत गायकवाड यांनी “मायाळू माय”द्वारे केले . अंधांच्या कोरड्या दुःखावर मीठ चोळणारी भोवतालची माणसं त्यांना उत्तरे देऊन संघर्ष करणाऱ्या अंध बांधवांवर आधारित “वाऱ्या संग लढताना, वादळ बनून जगणार हाय,” असा आत्मविश्वास प्रा. संजय बैरागी यांनी दिला. चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी या क्रांतिकारी कवितेबद्दल प्रा.बैरागी यांना शाबासकी देत बक्षीसही दिले. निकेश मदारे यांनी “वाटे वाटेत छळतो बोराटीचा काटा” रचनेतून सावधपण नमूद केले. कोरोना काळातील गमती-जमती वर आधारित अस्सल वऱ्हाडी झटक्यातील ज्ञानेश्वर वऱ्हाडे यांनी सादर केलेली कविता भाव खाऊन गेली.

आजीने सांगितलेल्या चिमणी कावळ्याच्या गोष्टीवर आधारित “तुझ्या चिमणीला मी समजू शकतो, पण माझ्या चिमणीला मीच कळत नाही..” मनोज आहेर यांची झणझणीत वास्तव मांडणारी कविता रसिकांनी उचलून धरली. “गुंड्या लफंग्यांची कैसी भरे लोकसभा... उघड बार देवा आता...’ ही मनोज सूर्यवंशी यांची सामाजिक विडंबनपर आधारित रचना रसिकांच्या पसंतीस उतरली. अध्यक्ष डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी दुःखासोबत रडत बसण्यापेक्षा आलेला क्षण आनंदी राहण्यात मजा आहे. अंधांचे दुःख हलके करणाऱ्या “गुपित माझ्या मनात लपलंय... मी वेदनाच तुडवित आले ...” अशा कविता सादर करून अंधांना स्फूर्ती दिली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या काव्यसंध्येत अंध कवींनी दिवस, महिने, वर्षे उलटून गेली तरी, वाटते अजून खूप काही सांगायचे आहे. तारुण्य अजून जगायचे आहे, अशा एका पेक्षा एक बहारदार रचना सादर करत तप्त उन्हाळ्यातील सायंकाळ टवटवीत व तजेलदार केली.

बातम्या आणखी आहेत...