आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:दोन वर्षांनंतर होणार होळीचा सण साजरा; तांड्यावर उत्साह

मंठा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील दोन वर्षापासून होळी आणि रंगपंचमीचे रंग बेरंग झाले होते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे सर्वत्र रंगांची उधळण होणार असे चित्र आहे. तालुक्यातील विविध तांड्यावर होळी आणि शिमग्याचा सण दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा होत असतो. मंठा शहरात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ठिकठिकाणी रंग आणि पिचकारीची दुकाने थाटली आहेत. कोरोनाचा प्रभाव संपल्यामुळे दोन वर्षानंतर प्रथमच होळीच्या रंगांची उधळण होणार आहे. यानिमित्ताने बच्चे कंपनीत विशेष उत्साह दिसून येत आहे. घरोघरी महिला भगिनी होलीका पूजन करून पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतात. बंजारा समाजात तर होळीचा आणि शिमग्याचा सण अतिशय उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या निमित्ताने तांड्यावर हलगीच्या तालावर महिला भगिनी गोलाकार फेर धरून लेंगी नृत्य सादर करतात. विविध पारंपारिक गाणी आणि भजने गायली जातात. या समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते.

पिचकारीच्या किमतीत वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत रंग आणि पिचकारीच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनामुळे पिचकारी निर्मितीचे उद्योग काही प्रमाणात ठप्प झाल्यामुळे किमती वाढल्या आहेत. होळी धुळवडीचा सण ग्रामीण भागातून विशेष उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने दिवसभर रंग खेळल्यानंतर शेतातून वनभोजनाचे कार्यक्रम होतात.

बातम्या आणखी आहेत...