आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतराव्या शतकापासून जाफराबाद येथे सुरु असलेली पाच दिवसाची रंगपंचमी आजही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात खेळली जाते. रंगपंचमीच्या निमित्ताने देवीची मिरवणूक काढण्यात येते. पारंपारिक प्रथेप्रमाणे रंगाची मुक्तपणे उधळण केली जाते. आठ पिढयापासून देवीचे सोंग घेण्याचा मान लोखंडे कुटुंबियांकडे आहे. निजाम राजवटीत जाफराबाद येथे १६३३ पासुन पाच दिवसांची रंगपंचमी खेळण्याची प्रथा सुरु झाली आहे. उत्तर हिंदुस्थानी समाजबांधवांनी ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवली. वसंत पंचमीपासुन रंगपंचमीला सुरुवात होते. दांडी पौर्णिमेला फाग होळी गीतासह सवाद्य मिरवणूक काढली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी गावात रंगमेळा भरवून तमाशा, जलशासह गुलाल मेळा खेळला जातो.
शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या मदार दरवाजाजवळील महेबूब सुबानी दर्ग्याजवळ रंगमेळा पोहचल्यानंतर मराठी आणि उत्तर हिंदुस्थानी समाजबांधवांमध्ये रंगाची उधळण करतात. मुस्लिम बांधव देखील रंगमेळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. रंगपंचमीच्या तिसऱ्या दिवशी रंगासाठी सवाद्य मिरवणुकीने जाऊन गावातील प्रतिष्ठित लोकांच्या अंगावर रंग टाकला जातो. त्यानंतर मानकरी यांच्या घरी पान- सुपारीचा कार्यक्रम होतो. चौथ्या दिवशी महाबुरीज मेळा घेतला जातो. या दिवशी गावातील सर्व समाजातील जेष्ठ नागरीक रंग खेळतात. रंगांची उधळन दिवसभर सुरु राहते. पंचमीच्या दिवशी देवीचे सोंग काढले जाते. यावर्षी ही स्वारी १२ मार्च रविवारी मध्यरात्री निघाली यात शहरातील अबाल वृध्दासह सर्व धर्मियांनी उपस्थित राहुन कालिंका देवीची पुजा अर्चा करीत मनोभावे ओवाळले.
कालिंका मातेचे सोंग अनुराधा नक्षत्रावर काढण्यात येते. मोहन लोखंडे,खंडूजी लोखंडे, आबाजी लोखंडे यांनी एका पिढी नंतर एक देवीच्या सोंगाचा मान देण्यात आला होता. त्यानंतर रामराव लोखंडे यांनी काही वर्ष सोंग घेतले त्यानंतर लव लोखंडे त्यांचे सुपुत्र यांना देवीच्या सोंगाचा मान मिळाला. दहा वर्षापुर्वी रामराव लोखंडे यांचे निधन झाले. तेव्हापासून सोंगाचा मान लव लोखंडे यांना शहरातील प्रतिष्ठितांनी दिला तर गतवर्षीपासुन लव लोखंडे यांचे धाकटे बंधु रवि लोखंडे हे सोंग घेण्याचा मान स्विकारत आहेत. रंगपंचमीच्या पाचव्यादिवशी टेंभे झेंडक्यांच्या उजेडात डफड्यांच्या तालावर कालींका देवीचे सोंग रात्रभर शहरातील घराघरापर्यंत पुजेसाठी नेण्यात येते. देवीच्या सोंगाप्रमाणे महिषासुराचे सोंग घेण्याची परंपरा दुबे घराण्याकडे कायम आहे. हातामध्ये ढाल मुसळ घेऊन देवीच्या समोर युध्दाचे आव्हान करण्यात येते या युध्दाला मकीरफ असे म्हणतात. देवीस पकडण्याचा मान बायस, जैस्वाल, गौतम कच्छवा, उपाध्याय यांच्या घराण्याकडे आजही कायम आहे. दानव मारल्यानंतर देवीच्या सोंगाचा विधीवत समारोप करण्यात आला. त्यानंतर मानकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.