आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमुद्रातील भूपृष्ठ पाण्याचे तापमान वाढल्याने कडाक्याची थंडी राहणाऱ्या महिन्यात यंदा उकाडा जाणवत आहे. मागील आठ दिवसांपासून ही स्थिती कायम असून दिवसा काहीसा उकाडा अन् रात्री बोचरी थंडी असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, डिसेंबर अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे कमाल ३० आणि किमान तापमान १४ याच दरम्यान राहणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उद्योगाची नगरी असलेल्या हॉट सिटी जालन्यातही थंडीचे प्रमाण तुलनेने चांगलेच वाढल्याचे पाहायला मिळाले. पाणी साठवणीचे प्रकल्प तसेच बागायती परिसर असलेल्या भागात थंडीचे प्रमाण अधिकच राहिले. एवढेच नाही तर नोव्हेंबर महिन्यात तर थंडीचा पारा हा १ नोव्हेंबर रोजी मोसमात सर्वात कमी म्हणजेच सर्वात कमी १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.
त्यानंतर मात्र, शीत, उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्याचा संगम होऊन तापमानात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर तसेच हिंद महासागरातील भूपृष्ठ भागातील तापमानात वाढ झाल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. एव्हढेच नाही तर आजपर्यंत डिसेंबर महिन्यात कधीच पाऊस झाला नाही. असे असले तरी विक्रम मोडणारा पाऊसही जालना जिल्ह्यात भोकरदन, बदनापूर तालुक्यात बरसल्याची नोंद झाली आहे. मात्र, हे प्रमाण कमी होऊन हळू हळू थंडीच्या महिन्याची स्थिती पुर्व पदावर येईल, असाही हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, तापमान हे डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त ३०, २९ तर कमीत कमी १५, १४ अंशावर स्थिर राहणार आहे.
दवबिंदू अन् धुक्याचे प्रमाण वाढले
रात्री १२ वाजेनंतर हवेत धुक्याचे प्रमाण पहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळीच आभाळ झाल्यासारखे धुके पहायला मिळत आहे. हे धुके सकाळी आठ वाजेपर्यंत कायम राहत आहे. पहाटे पहाटे हलक्या धुक्याची चादर पहायला मिळत आहे. तर शेती परिसरातील पानांतील गारव्या बरोबरच दवबिंदूही आठ वाजेपर्यंत पहायला मिळत आहे.
धुक्याने द्राक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम
रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू तसेच हरभरा पिकांची लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणात झाली आहे. हरभरा, गहू हे पीक थंडीच्या दिवसातच चांगल्या प्रमाणात वाढते. तापमान अधिक राहिल्यास पिकांचे उत्पादन घटते. सध्या ऐन फुलाेऱ्याच्या स्थितीतील पीकही आहे. यामुळे हरभऱ्याला याचा फटका आहे. तर द्राक्ष बागांवरही द्राक्षांची गुणवत्तेला फटका देणारे हे वातावरण ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.