आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढाचा:केंद्रीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून कामे तातडीने करा

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे निर्देश, राजूरला दिशा समितीची बैठक

जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली राजूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार नारायण कुचे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, समितीचे सदस्य गजानन घाडगे, भाऊसाहेब भुजंग, समाधान शेरकर, फैसल चाऊस, रंजना जाधव, सुनिता कोल्हे, अनिल सरकटे, गणेश गाडेकर, ज्योती नवले, शैलेंद्र पवार, प्रशांत दानवे, प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात महिलांना एकत्र करून बचगटांची स्थापना करण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात ज्या होतकरू महिला आहेत त्यांना एकत्र करण्यात यावे व बचतगटाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करत आपले जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. उद्योग उभारणीसाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीही अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मागेल त्या मजुराला विहित वेळेत काम मिळेल या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात यावे. कामे मंजूर करत असताना कुशल व अकुशल कामाचे प्रमाण ६०:४० राहील.

तसेच ही कामे करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समानतेने कामे होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश दानवे यांनी दिले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जी गावे मुख्य रस्त्याला जोडलेली नाहीत अशा गावांत रस्त्याची कामे करण्यात येतात. जालना जिल्ह्यात जी गावे मुख्य रस्त्यांना जोडलेली नाहीत अशा रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा व अशा गावांमध्ये रस्त्याची कामे प्रस्तावित करण्यात यावीत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल. तसेच या योजनेचा लाभ प्रत्येक गरजू व पात्र लाभार्थ्यांना होईल, याची काळजी घेण्याचे निर्देशही दानवे यांनी दिले. यावेळी आमदार नारायण कुचे यांनी बैठकीत उपयुक्त सूचना मांडल्या.

केंद्रस्तरीय विविध योजनांचा जिल्ह्यातील कामकाजाचा घेतला आढावा
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय सामाजिक अर्थसह्यता कार्यक्रम, स्वछ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजना आदी योजनांचाही मंत्री रावसाहेब दानवे यांनी सविस्तर आढावा घेतला.

बातम्या आणखी आहेत...