आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जालना जिल्ह्यात 13 गावांतील घराघरांत श्री हनुमानांऐवजी होते जांबुवंतांची पूजा

महेश जोशी | जांबुवंत गड, जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबड तालुक्यातील जामखेडनजीकच्या गावांतील परंपरा; हनुमानाचे मंदिर, मूर्ती किंवा घरात फोटोही नाही

देशभरात हनुमान जयंती उद्या मोठ्या भक्तिभावाने साजरी होईल. या वेळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या १३ गावांत, वाड्यांत मात्र शुकशुकाट असेल. कारण येथील ग्रामस्थ हनुमान नव्हे तर प्रभू रामचंद्रांचे मार्गदर्शक जांबुवंत यांचे निस्सीम भक्त आहेत. यामुळे गावात हनुमानाचे मंदिर, मूर्ती किंवा फोटो नाही. घराघरात जांबुवंतांचीच पूजा होते. शुभकार्याची सुरुवात त्यांच्याच दर्शनाने होते. औरंगाबादहून ४५ किलोमीटर अंतरावर जामखेड गावात डोंगरमाथ्यावर श्री क्षेत्र जांबुवंतगड संस्थान आहे. पुरातन काळात हा भाग दंडकारण्यात मोडत होता. येथे रामायणासोबत महाभारताशी संबंधित आख्यायिका प्रचलित आहेत. येथेच जांबुवंतांचे राज्यातील एकमेव मंदिर आहे.

जांबुवंत वयाने ज्येष्ठ असल्याने ते श्रीरामांना तसेच हनुमानालाही सल्ला देत असत : गावकऱ्यांची भावना, शुभकार्याचा प्रारंभ होतो दर्शनाने जांबुवंतांनी मागितला एकांतवास जांबुवंतांच्या मंदिरात सोनटक्के पुजारी कुटुंबातील चौथी पिढी सेवा देत आहे. जांबुवंतांचा येथेच एका गुहेत निवास असल्याची या भागातील भाविकांची श्रद्धा आहे. येथेच आता एक भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. सोबत नळ व नीलही विराजमान आहेत. हा परिसर निसर्गरम्य असून संस्थानने मंदिर परिसरात बऱ्याच सुविधा पुरवल्या आहेत. येथे दररोज विनामूल्य अन्नदान होते. जांबुवंतावरून परिसराचे नाव जामखेड पडले, असे मानले जाते. आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. जांबुवंतांचा शुक्रवारी वार असतो.

जामखेड गावात डोंगरमाथ्यावर असलेले हेच श्री क्षेत्र जांबुवंतगड संस्थान. या भव्य मंदिरात श्री जांबुवंतांची अशी मूर्ती आहे.

हनुमान जयंतीही नाही
माळवाडी, भोकरवाडी, ठाकरवाडी, नागोण्याची वाडी, लिंबेवाडी, जोगेश्वरवाडी, नारळाचीवाडी, कोंबडवाडी, विठ्ठलवाडी, पागेरवाडी, ठोकळ्याचीवाडी, बक्ष्याची वाडी आणि जामखेड या १३ गावांत हनुमान जयंती साजरी होत नाही. १९९० पर्यंत या सर्व गावांचा एकच सरपंच होता. आता ५ सरपंच आहेत. सर्व मिळून १३ ते १४ हजार लोकसंख्या आहे. येथे हनुमान जयंतीऐवजी जांबुवंतांची पूजा होईल. “जांबुवंत महाराज की जय’ असा उद्घोष होईल.

गावाला जोडले गेले रामायण-महाभारताचे संदर्भ
^खरे तर हिंदूंचे आराध्य दैवत श्री हनुमान आहे. आज प्रत्येक कार्याची सुरुवात श्री हनुमानांच्या स्मरणाने होते. परंतु, आमच्यासाठी या १३ गावांत पहिला मान जांबुवंतांचा आहे. -शिवाजी वैद्य, ग्रामस्थ

^पंचक्रोशीत हनुमानाचे एकही मंदिर नाही. आम्ही जांबुवंतांचे भक्त आहोत. कार्य त्यांच्या आशीर्वादानेच सफल होते. -राहुल रायवाल, ग्रामस्थ

^आमचे आराध्य दैवत जांबुवंतच आहेत. प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात या सर्व गावांमध्ये आजही श्री जांबुवतांच्या दर्शनाने होते. -द्रौपदी वैद्य, ग्रामस्थ

जांबुवंत व हनुमान दोघेही श्रीरामांचे भक्त होते. पण जांबुवंत वयाने ज्येष्ठ. ते श्रीरामांना, हनुमानालाही सल्ला देत. त्यांचा येथे निवास आहे. त्यामुळे १३ गावांत हनुमानाचे एकही मंदिर नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

३३ हजार कोटी तीर्थांचा मान
^जांबुवंतांनी कन्या जांबुवंतीशी विवाह करू इच्छिणाऱ्यास त्यांचा मलयुद्धात पराभव करण्याची अट ठेवली. श्रीराम वचनाप्रमाणे पुढील जन्मात कृष्णरूपात आले व जांबुवतांचा पराभव केला. या विवाहाला ३३ हजार कोटी देव आले होते. म्हणून जामखेडला ३३ हजार कोटी तीर्थाचा मान आहे.
-डॉ. गणेश वाघ, अभ्यासक