आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गट:भोकरदन तालुक्यात भायडी रद्द होऊन सुरंगळी, चांदई, वालसा वडाळा नवा गट

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या रचना विभागीय आयुक्त आणि जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. या नवीन गट व गणांच्या रचनेनुसार पूर्वी असलेल्या जिल्हा परिषद गटापैकी काही गट वगळण्यात आले तर काही नवीन अस्तित्त्वात आले आहे. भोकरदन तालुक्यातील तळेगाव हे फुलंब्री तालुक्यात गेल्याने आता पूर्वीचा तळेगाव गट वगळन्यात आला तर जुना भायडी हा गट बदलून आला. आता वालसा वडाळा आणि सुरंगळी हे दोन गट नव्याने अस्तित्त्वात आले आहेत. भोकरदन तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे बारा गट व पंचायत समितीचे २४ गण असणार आहेत. गटाच्या पुनर्रचनेमुळे भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे. काही पक्षासाठीची रचना राजकीय दृष्ट्या फायदेशीर असली तर काहींचा यामुळे हिरमोड झाला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांचे गाव दगडवाडी हे आव्हाना गटात गेले असल्यामुळे आव्हानात गटातील भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. अनेक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून गावागावात जनसंपर्क मेळावे, लग्न समारंभ भेटी गाठी, क्रिकेट, कबड्डी स्पर्धा या माध्यमातून तयारी सुरू केली होती. या पुनर्रचनेमुळे काहींच्या मेहनतीवर पाणी फिरले तर काहींना आयती संधी आल्याचे दिसून येत आहे. माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांचे मनापूर गाव हे आव्हाना गटातून वालसा वडाळा या गटात गेले असून यंदा परंपरागत मतदारसंघ आव्हाना मधून लढणार की वालसा वडाळा गटातून त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख जिल्हा परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणार असल्याची चर्चा होती, गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागातील आपला वावर चांगलाच वाढवला होता. त्यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनीषा जंजाळ यांचा परंपरागत भायडी गटाची देखील पुनर्रचना झाली असून त्यांना आता वालसा वडाळा या गटात त्यांना राजकीय कारकीर्द आजमवावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...