आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगीकरणाला विरोध म्हणून महावितरण कर्मचाऱ्यांनी ४ जानेवारीपासून ७२ तास संप पुकारला आहे. मंगळवारी रात्रीपासून या संपाला सुरुवात होत असल्याने महावितरणने आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी संपकाळात महावितरणकडून कार्यकारी अधिकाऱ्यांवर फाॅल्ट दुरुस्तीची धुरा देण्यात आली आहे.
शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आधार घेतला जात आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयालाने आपले काम ठप्प होऊ नये म्हणून सहा तासांचा बॅटरी बॅकअप आणि सौर यंत्रणा सज्ज केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी महावितरणने तीन हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहे. अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवानासाठी अर्ज केलेला आहे.
ही बाब म्हणजे महावितरणचे खासगीकरण होय. यामुळे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण करणाऱ्या महावितरणने कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला आहे. याचा उपयोग करून खासगी कंपन्या कमाई करणार आहेत. तसेच ही बाब ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांसाठी धाेकादायक असून समांतर परवान्याला परवानगी देण्यात येऊ नये यासाठी राज्यभरासह जालन्यात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघर्ष समितीने ४ जानेवारी रोजीपासूनच्या ७२ तासांच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढे १६ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर द्वारसभा घेणे तर १८ जानेवारी रोजीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेणार आहेत. जालन्यात एकूण २४ संघटनांनी सहभाग नोंदवला आहे.
या संपामुळे वीज सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महावितरणने मात्र सर्व आव्हानांवर मात करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता व तांत्रिक कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालयामधील विद्युत अभियंता व कर्मचारी यांच्याशी संपर्क करण्यात आला असून त्यांचे सहकार्य मिळणार आहे. बाह्यस्रोत कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच कर्मचारी हे आंदोलनात सहभागी होणार आहेत. यामुळे यांचा कारभार हा कंत्राटदार, आयटीआयधारक, खासगी कामे करणारी यंत्रणा, आऊटसोर्सिंग कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या हाती आंदोलनकाळात धुरा दिली जाणार आहे.
असे आहेत हेल्पलाइन क्रमांक
जालना ग्रामीण, विभाग मंठा, परतूर, घनसावंगी अंबड या तालुक्यांसाठी ७८७५७६४०१४ या क्रमांकावर तर जालना शहर, भोकरदन, बदनापूर, जाफराबाद तालुक्यासाठी कार्यकारी अभियंता यांना ७८७५७६४००५, ७८७५७६४०१३ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्व विभागांना पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाच ते सहा तासांचा बॅटरी बॅकअप आहे, तर सौरऊर्जेवर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे काम चालवले जाऊ शकते. त्याशिवाय सर्व विभागांना आपापल्या पद्धतीने पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विविध विभागांच्या आस्थापना स्वतंत्र असल्यामुळे त्या-त्या पातळीवर ते निर्णय घेतील. जनतेची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल. - केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी
जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार
जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच कर्मचारी हे आंदोलनात सहभागी होणार आहेत. यामुळे यांचा कारभार हा कंत्राटदार, आयटीआयधारक, खासगी कामे करणारी यंत्रणा, आऊटसोर्सिंग कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या हाती आंदोलनकाळात धुरा दिली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.