आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:घनसावंगी तालुक्यात सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच; आज होणार निर्णय

विठ्ठल काळे | कुंभार पिंपळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. कुंभार पिंपळगावच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये काही किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदारांची काही वेळेसाठी तारांबळ उडाली.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत हा केंद्रबिंदू असून विकास कामासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. घनसावंगी तालुक्यात दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडत उत्साह दाखवला. तालुक्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत गेली आहे. तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमधील सरपंच पदासाठी १०८ तर सदस्य करीता ६५५ पदांसाठी ७६३ उमेदवारांचे भाग्य इव्हीएम यंत्रात बंद झाले. मंगळवारी मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर खरे चि़त्र स्पष्ट होईल. यंदा सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने निवडणुकीला चांगलीच रंगत आली होती. सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांनी विविध प्रकारचे आश्वासन देऊन मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शिवाय शंभरी पार केलेले वृद्ध व्यक्ती दिव्यांग यांना मतदान करण्यासाठी तालुक्यातील तहसील प्रशासनाने व्हीलचेअर आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने तहसील प्रशासनावर दिव्यांग व्यक्तींपी रोष व्यक्त केला. तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, लिंबी, शिवणगाव या गावांत किरकोळ कारणामुळे वादविवाद निर्माण झाला होता. तालुक्यात कुंभार पिंपळगाव, रांजणी, पिंपरखेड, लिंबी, मूर्ती, बोलेगाव अशा अनेक ठिकाणच्या गावांमधील प्रामुख्याने मुख्य लढती झाल्या. ३४ ग्रामपंचायतीसाठी ५३ हजार ५९९ मतदारांपैकी ४४ हजार २८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी १४ टेबल असून मतमोजणीच्या ८ फेऱ्या होतील. असे नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी सांगितले. दरम्यान, मतमोजणी कक्षात गाव निहाय उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनाचा सोडण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे सांगितले.

बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे झाले हाल : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी आणि पोलिस केंद्रापर्यंत मतपेट्या पोहोचवण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे नियमित प्रवाशांना प्रवास करण्यासाठी बसेस नसल्याने विविध मार्गावरील प्रवाशांना शनिवार व रविवार या दोन दिवस नाहक त्रास सहन करावा लागला.

पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली
मंगळवारी मतमोजणी होणार असून यादरम्यान शांतता अबाधित राहावी यासाठी निवडणुकीत विजयी उमेदवारांनी मिरवणुका काढून गुलालाची उधळण घोषणाबाजी करू नये. यातून काही वादविवाद निर्माण होईल असे कृत्य करू नये म्हणून पोलिसांकडून कलम १४९ ची नोटीस बजावण्यात आली अाहे. मतमोजणीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे घनसावंगीचे पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...