आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक भुईसपाट:पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने शेकडो हेक्टवरील मक पीक भुईसपाट

पिंपळगाव रेणुकाई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात मागील तीन ते चार दिवसापुर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले असले तरी शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील मकाचे पिक भुईसपाट झाले असल्याने शेतकऱ्यांनी बघितलेल्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला. प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन ठोस मदत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकऱ्यांनी यंदा पंधरा जुन नंतर समाधानकारक पावसावर कपाशी, मका, सोयाबीन, मिरची, उडीद, मुग आदी पिकाची लागवड केली आहे. पाऊस देखील समाधानकारक असल्याने पिके देखील जोमात होती. परंतु जुन व जुलै महिन्यात संततधार पावसामुळे शेतातील तोडणीसाडी शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील मिरचीचे पिक उद्ववस्त झाले. अनेक शेतकऱ्यांना उपाययोजना करुन देखील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतातील उभे मिरचीचे पिक उपटून फेकावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

यातच शेतकऱ्यांची भिस्त आता मका, कपाशी, सोयाबीन पिकावर आहे. कारण शेतकऱ्यांचे अर्थकारण हे संपूर्ण खरिपावर अवलंबून असते. माञ त्याला देखील दरवर्षी निसर्गाचे ग्रहण लागत आहे. मका, सोयाबीन व कपाशीचे ऐन जोमात असताना मागील चार दिवसापुर्वी झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यात शेकडो हेक्टरवरील मकाचे पिक जमिनदोस्त झाले आहे. त्यामुळे लावलेला खर्च देखील या पिकातुन निघणे मुश्कील असल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. मागील वर्षी देखील परतीच्या पावसाने पिंपळगाव रेणुकाई परिसरात हाहाकार घालत खरिपातील हाताशी आलेल्या पिकाचे होत्याचे नव्हते केले होते. त्यातुन सावरत शेतकऱ्यांनी यंदा उसनवारी, बँकेचे उंबरठे झिजवत खरिपातील पेरणी पूर्ण केली.

मात्र त्यात देखील निसर्ग अशा प्रकारे खोडा घालत असल्याने शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहे. आले वर्षे शेतकऱ्यांसाठी सारखेच जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे. परिसरात नुकसान झालेल्या पिंकांची प्रशासनाने किमान घटनास्थळी जाऊन पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
भोकरदन तालुक्यात जुन पूर्ण व जुलैचा अर्धा महिना संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे खरिपातील पेरणी केलेली सर्वच पिके पिकळी पडून पिकांची वाढ देखील खुंटली. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा उरलेली नाही. यातच आता पुन्हा वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माञ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून केला जात आहे.

एक एकर मक्याचे पीक झाले जमीनदोस्त
शेतात पै-पै जमा करुन दोन एकला मकाची पेरणी केली होती. माञ चार दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसासह वादळी वाऱ्यात संपूर्ण मका जमिनदोस्त झाली आहे. जमिनीवर झोपलेल्या मकाकडे पाहुन खुप वेदना होत आहे. झालेले नुकसान भरून न निघणारे आहे. यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे. - संतोष देशमुख, शेतकरी, पिंपळगाव रे.

बातम्या आणखी आहेत...