आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:तीर्थपुरी येथे ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, धुळीने व्यापारी, नागरिक त्रस्त

तीर्थपुरी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरातून जात असलेल्या घनसावंगी फाटा ते कुंभार पिंपळगाव फाटा आणि शहागड मार्ग हे रस्ते खड्डेमय झाले असून वाहनांना खड्ड्यामुळे आणि रस्त्यावरील पादचाऱ्यासह व्यापाऱ्यांना धुळीमुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून दुरावस्था झालेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळून कधी दिलासा मिळणार ? असा प्रश्न तीर्थपुरी करांकडून उपस्थित केला जात आहे.

रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. दिवसातून शेकडो लहान-मोठी वाहने वावरतात. या रस्त्यावर बँका, व्यापारी संकुले असल्याने शहरासह आजूबाजूच्या वीस ते पंचवीस खेड्यातील नागरिक विविध कामासाठी येथे येतात. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा रस्ता गजबजलेला असतो. वाहनामुळे धुळीचे प्रचंड लोट उडत असल्याने रस्त्यावरील आजूबाजूच्या दुकानांत धुळीचे लोट घुसतात त्यामुळे दुकानातील वस्तू, माल खराब होतात. तसेच रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना धुळीचा प्रचंड त्रास होतो आहे. धुळीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. तीर्थपुरी शहरातील छत्रपती शिवाजीराजे चौक ते कुंभार पिंपळगाव फाटा या मार्गावर प्रचंड खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना या रस्त्याने वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे.

शहरातून जाणाऱ्या या सर्व रस्त्याबरोबरच धोबी नाल्यावरील पुलाचे संथगतीने सुरू असलेले काम देखील लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. दरम्यान, रस्त्याचे काम होईपर्यंत नगरपंचायतच्या वतीने धुळीच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर दिवसांतून दोन वेळेस टॅंकरने पाणी टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोन वेळा भूमिपूजन होऊनही रस्त्याची अवस्था जैसे थेच गेल्या अनेक वर्षांपासून शहरातुन जाणाऱ्या या रस्त्यांची भयंकर दुर्दशा पाहून तत्कालीन पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते अडीच वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाचा मोठया थाटामाटात शुभारंभ केला होता. त्यानंतर काही कारणाने पुढे काहीच झाले नाही. त्यांनतर जुलै २०२२ ला दुसऱ्यांदा पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कमासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांडलीकर यांनी घोषणा केली होती. दुसऱ्यांदा भूमिपूजन होऊन चार महिने झाले तरी अद्याप रस्त्यांची परिस्थिती जैसे थे च आहे.

बातम्या आणखी आहेत...