आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुपालक त्रस्त:पशुवैद्यकीय दवाखान्यात असुविधा; पाच गावांतील जनावरांचे झाले हाल

पिंपळगाव रेणुकाई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील जनावरांना वेळेत व मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून भोकरदन तालुक्यातील पारध येथे कित्येक वर्षापासून श्रेणी १ चा पशूवैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्यात पशूवैद्यकीय डॉक्टरच नसल्याने केवळ दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हा दवाखाना सुरू आहे. त्यामुळे परिसरातील पाच गावातील जनावरांचे आरोग्य आजघडीला रामभरोसे आहे. शिवाय सध्या लंपीचा काळ असल्याने या भागातील पाच जनावरे दगावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जनावरांना आरोग्य सेवा देण्यासाठी पारध येथे पशु वैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे. या दवाखान्या अंतर्गत पारध बुद्रुक, पारध खुर्द, सावंगी अवघडराव, पिंपळगाव रेणुकाई आणि पद्मावती या पाच गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाचही गावातील जनावरांची संख्या हजारोच्या घरात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गायी, म्हशी, शेळ्या यांचा समावेश आहे. दरम्यान सध्या परिसरात शेती जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठया प्रमाणात करतात.

या व्यवसायातून चार पैसे मिळतील म्हणून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण दुधाच्या व्यवसायात उतरले आहेत. पिंपळगाव रेणुकाई येथे रोज १ हजार २०० लिटर दुध संकलन होते. परंतु अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि जनावरांवर उपचार करण्यासाठी पारध येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नसल्याने पशुपालक कमालीचे त्रस्त आहेत. मागील काही महिन्यापासुन परिसरात जनावरांमध्ये लंपी आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाकडून जनावरांचे बाजार देखील बंद करण्यात आलेले आहेत.

माञ पशु विभागाकडून बाधीत जनावरांना वेळेत उपचार मिळत नसल्याने उपचारा अभावी परिसातील जवळपास तेरा जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर जनावरे लम्पी बाधीत असुन मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी आहेत. शिवाय लम्पी आजाराची सर्व औषधे पारध येथील पशुवैदयकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत पण पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने ती पशुपालकांना मिळू शकत नाही. पर्यायाने सदरची औषधी पशुपालकांना जास्तीची किंमत मोजून औषधी दुकानातून खरेदी करावी लागत आहे. दवाखान्यात उपस्थीत दोन चतुर्थश्रेणीचे कर्मचारी त्यांना नेमून दिलेली कामे करतात ते जनावरांवर उपचार करू शकत नाही. कारण त्यांना याबाबत ज्ञान नाही. त्यांचे एक,दोन खासगी पशुवैदयकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आहे ते त्यांच्या परीने जनावरांवर उपचार करतात त्यामुळे काही प्रमाणात पशूपालकांना दिलासा मिळतो. मात्र पैसे खर्च करून औषधी दुकानांमधूनच खरेदी करावी लागत आहे. दिवसेंदिवस लंपी आजाराने बाधीत जनावरांची संख्या वाढत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिक्त जागा त्वरीत भरण्याची मागणी होत

लम्पीने जनावरे दगावली
माझ्याकडे दुधाळ जनावरे आहेत. मी मोठ्या मेहनतीने दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र वेळेवर उपचार मिळू शकला नसण्याने माझ्या दोन दुधाळ गायी लंपी आजाराने दगावल्या आहेत. जर पारधच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर असते आणि वेळेवर उपचार मिळाला असता तर माझ्या दोन्ही गायी वाचू शकल्या असत्या. माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाळू लक्कस, पशूपालक, पारध खुर्द.

बातम्या आणखी आहेत...