आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कुंभार पिंपळगावत व जांबसमर्थसह परिसरातील चोऱ्या, दरोडे, गोळीबार अशा प्रकारच्या अनेक गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्षामुळे व्यापाऱ्यावर गोळीबार करून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. यामुळे छोट्या-मोठ्या व्यवसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून बाजार पेठेत असुरक्षितता वाटू लागली आहे. पोलिस प्रशासनाने आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसभर कडक बंदोबस्त ठेवावा. कुंभार पिंपळगाव येथील पोलिस चौकीतील मनुष्यबळ वाढवून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
घनसावंगीसह कुंभार पिंपळगाव परिसरात अवैध धंद्याचे प्रमाणही वाढले असून यात अवैध वाहतूक, दारू, हातभट्टी, गुटखा यासह आदी अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. पोलिस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतून केला जात आहे. मागील काही महिन्यापूर्वी बारचा हप्ता दिला नाही म्हणून तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार घनसावंगी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकास पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले होते.
घनसावंगी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांचे चांगल्या प्रकारे मनुष्यबळ असताना देखील घनसावंगीसह कुंभार पिंपळगाव परिसरात मोबाइल चोरी, दुचाकी चोरी, सोयाबीनचे गोदाम फोडणे, दुकाना फोडणे, विहिरीतील मोटर चोरी होणे, अशा अनेक प्रकारचे चोरीचे गुन्हे घडत आहेत. राज्यात गुटखा व दारू विक्रीला बंदी असतानाही घनसावंगी तालुक्यासह कुंभार पिंपळगाव परिसरात गुटखा व दारूची विक्री जोमात सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा व दारू विक्री जोमात आहे.
पोलिस ठाण्याच्या व चौकीच्या हद्दीत मुख्य बाजारपेठ, तीर्थक्षेत्रे, महाविद्यालय, राष्ट्रीयकृत बँका, प्राथमिक आरोग्य केंद्र, सहकारी संस्था व मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असल्याने घनसांवगी पोलीस ठाण्याला पोलिसाचे मनुष्यबळ आहे. शिवाय एखाद्याची दुचाकी मोबाईल चोरीस गेला की त्यांची केवळ तक्रार नोंदवून घेतली जाते परंतु पोलीस अधिकाऱ्याकडून त्या चोरीस गेलेल्या गुन्ह्याचा शोध लावला जात नसल्यामुळे दुचाकी व मोबाईल चोर मोकाट फिरून पुन्हा गुन्हेगारी करत असल्याचे परिसरातील नागरिकातून बोलले जात आहे. अवैध धंदे व चोऱ्यामुळे घनसावंगी तालुक्यासह कुंभार पिंपळगाव परिसरात पोलिस ठाणे व चौकीतील कारभाराविषयी नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावणे सुरू
घनसावंगी ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्याचे काम सुरू आहे. काही गुन्हे उघडही झाले आहेत. परंतु, काही गुन्ह्यांतील आरोपी फरार असून त्यांचाही शोध सुरू आहे. व्यापाऱ्यांनी आपापली सुरक्षितता वाढवावी दुकानासमोरील बंद पडलेली सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावीत. व प्रत्येक चौकात रात्री एक, दोन वॉचमन ठेवावेत व दुकानात व्यापाऱ्यांनी रात्रीच्या वेळेला दोन तीन कामगारांना सोबत ठेवूनच दुकान सुरू ठेवावी व शक्यतो व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील व्यवहार ऑनलाइन करावेत. आम्ही आठवडी बाजार दिवशी बंदोबस्त वाढवू रात्रीची गस्तही वाढू सध्या काही घटनेच्या तपासासाठी आमचे काही कर्मचारी त्या कामात आहेत. कुंभार पिंपळगावमधील लवकरच रात्रीची गस्त वाढवू. शिवाय अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे घनसावंगी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले.
सर्व अवैध धंदे बंद करण्याची महिला वर्गातून मागणी
पोलिस ठाणे व चौकीच्या हद्दीमध्ये असे अवैध धंदे चालू आहेत याची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी आणि अवैध धंदे बंद करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. शिवाय तरुण पिढी व्यसनाधिनतेपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. शिवाय अवैध धंदे यांच्यावर कडक कारवाई करून वचक बसवावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.