आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भाव

शेलूद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूदसह परिसरात या आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या तुरीचे पीक फुले व शेंगाच्या अवस्थेत असून या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आधीच शेतकरी अतीवृष्टीमुळे हवालदिल झालेला असताना त्यात आता तुरीचे उत्पादन वाचविण्यासाठी चार, चार दिवसांत कीटकनाशक औषधीची फवारणी करु लागला आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अगोदरच खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कापसाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील तूर पीक चांगले असले तरी शेतकऱ्याची मदार आता तूर पिकावरच अवलंबून आहे. मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस झाला नसला तरी पेरणी वेळेवर झाली होती.

परंतु त्यानंतर पावसाने दोन महिने दडी दिल्याने उडीद, मुग, सोयाबीन या कमी कालावधीत येणाऱ्या पीकांवर मोठा फटका बसला होता. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यातील परतीचा पाऊस तूर पीकासाठी पोषक ठरला गेला असला तरीही आता तूर पीकाला फुले बहरावर व काही ठिकाणी शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र चालू आठवड्यापासून रात्री धुके व ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तूर पिकासाठी घातक ठरू लागले आहे.अशा ढगाळ वातावरणात तूर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. हिरवी व चाकलेटी अळी, बोंडअळी, पाने गुंडाळनारी, घाटे अळी तसेच शेंग माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. दरम्यान, तूर पीक वाचविण्यासाठी काही शेतकरी महागड्या किटकनाशक औषधीची फवारणी करावी लागत असून शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त तूर पिकाच्या उत्पन्नावरच अवलंबून असल्याचे शेतकरी कृष्णा खडके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...