आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई मागणी:पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव;  शेतकऱ्यांकडून फवारणीस वेग

तीर्थपुरी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

घनसावंगी तालुक्यात पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे शेतात तण वाढून खरिपाच्या कापूस, सोयाबीनसह उसाच्या पिकांवर गोगलगाय, मावा, तुडतुडे, अळीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांनी फवारणीसाठी लगबग सुरू केली आहे. तसेच पिकांत वाढलेले तण काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तालुक्यातील तीर्थपुरी, बानेगाव, मंगरूळ, भोगगाव, रामसगाव, खालापुरी, मुरमा, कंडारी, भार्डी, भणंग जळगाव, दैठणा, जोगलादेवी भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी-लागवड केली आहे. पेरणीनंतर पावसाची सतत रिपीरिप सुरूच होती. पावसामुळे पिके चांगली आली. मात्र पावसाची उघडीप न झाल्याने शेतात गवत, तण वाढून पिकाला नुकसानकारक होऊ लागले.

तसेच विविध रोगाचा देखील प्रादुर्भाव वाढल्याने पिक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता कधी उघडीप तर कधी पावसाची सरी असा ऊन, पावसाचा खेळ सुरू असून पीक हातचे जाऊ नये म्हणून शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. तसेच शेतात वाढलेले तण काढण्यासाठी मजुरांची कमतरता निर्माण झाली असून मजूर उपलब्ध करण्यासाठी शेतकरी गावोगावी जाऊन मजूर आणून खुरपणीची कामे उरकून घेत आहेत. रोजंदारीपेक्षा गुत्ते घेण्याकडे मजुरांचा कल असल्याने गुत्ते परवडत नसले तरी पर्याय नसल्याने मजूर म्हणतील तसे ऐकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. सध्या शेतात फवारणीच्या कामाची लगबग पहायला मिळत आहे.

बानेगाव, भोगगाव, रामसगाव, जोगलादेवी, दैठणा आदी भागातील सोयाबीनच्या पिकांवर गोगलगाय कीटकांचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाला असून प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी बानेगावचे शेतकरी जगदीश उढाण यांनी घनसावंगी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...