आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या हवामानामुळे शेतकरी पिकांना संरक्षण मिळावे म्हणून जिल्ह्यातील ७ लाख ४२ हजार ८८० शेतकऱ्यांनी ३ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा एचडीएफसी इर्गो या कंपनीकडे उतरवला. रक्कम भरताना शेतकऱ्यांनी पाच ते दहा हजारांची रक्कम दिली. मात्र, नुकसानीनंतर प्रत्यक्षात हजार, दीड हजार रुपये देत शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे.
शेतकऱ्यांनी खरिपात ३१.०७ कोटींची विमा संरक्षित रक्कम विमा कंपनीला दिली. यामध्ये राज्याकडून विमा हप्ता रक्कम १५१.३३ कोटी, तर केंद्राकडून १४८.२८ कोटी रुपयांचा हिस्सा विमा कंपनीला देण्यात आला. या वेळी विमा कंपनीकडे ३३०.६९ कोटींच्या विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पैशाची तडजोड करीत विमा कंपनीकडे पिकाचा विमा उतरवला. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुसतीच मदत जाहीर केली. मात्र, अद्याप ती मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही.
त्यात दुसरीकडे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात मनमानीपणाने विमा रक्कम अदा करण्यास सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांनी दहा हजार भरले असतील, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपये टाकण्याचा प्रताप विमा कंपनीकडून करण्यात आला. असे कितीतरी शेतकरी या प्रकाराचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात पीक काढणीच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. या नुकसानीच्या ६२ हजार ११८ शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४० हजार ८९० शेतकऱ्यांच्या तक्रारींचे ३ नोव्हेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या क्षेत्रावर शेतकऱ्यांना किती िवमा रक्कम द्यावयाची याबाबतची गणित जुळवणी सुरू आहे.
गोपाल नागवे, वानडगाव, ता. जालना
या शेतकऱ्याने सोयाबीन, मूग, कापूस या तीन पिकांसाठी तीन एकर क्षेत्रावरील विमा संरक्षित रक्कम ५५०० रुपये भरले होते. यातून आता केवळ १६५० रुपये खात्यावर जमा झाले आहेत. या संदर्भात विमा कंपनीशी संपर्क केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवा, असे सांगण्यात आले.
निवृत्ती चौधरी, दहिफळ काळे
यांनी दोन एकर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८५० रुपये भरली होती. या शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही. याबाबत विमा कंपनीकडे चौकशी केल्यानंतर पुढील पैसे मिळणार असल्याचे सांगितले.
शंकर मयूरे, पिंपळगाव रेणुकाई, ता. भोकरदन
या शेतकऱ्याने ५ एकर क्षेत्रासाठी सोयाबीन, मका तसेच इतर पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम १० हजार रुपये विमा कंपनीकडे भरली होती. नोव्हेंबर महिन्यात या शेतकऱ्याच्या खात्यावर केवळ एक हजार रुपये आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.