आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेचेही आयोजन:14 नोव्हेंबरपासून जागर सुसंस्काराचा कार्यक्रम

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालनातर्फे बालदिन ते साने गुरुजी जयंती दिनानिमित्त (१४ नोव्हेंबर) सोमवारपासून ‘जागर सुसंस्काराचा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकुमार संमेलन,बालकवींचे कविसंमेलन यासह ३ हजार विद्यार्थी "श्यामची आई' या पुस्तकावर संस्कार परीक्षा देणार आहेत, अशी माहिती साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांनी दिली आहे.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेतर्फे (१४ नोव्हेंबर)सोमवारी बालदिनापासून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे उदघाटन बालदिनी कवी उमेश घेवरीकर यांचा ‘ मी साने गुरुजी बोलतोय! ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध शाळांतील ३ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘श्यामची आई' या ग्रंथावर आधारित संस्कार परीक्षा घेण्यात येणार आहे. अंबाजोगाई येथील ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक तथा कवी अभिजीत जोंधळे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध स्तंभलेखक, बहुरंगी कलाकार सुधीर कोरटीकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जागर सुसंस्काराचा कार्यक्रमात कर्णबधिर राधिका भगवान शेटे हिने तयार केलेल्या विविध वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.चित्रकार सुनील पवार यांनी रेखाटलेल्या ‘ श्यामची आई ‘ या ग्रंथातील कथांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. उपक्रमात चित्रकला,रंगभरण, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बालकुमार महोत्सव, बालकवींचे कविसंमेलन यासह विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.देवगाव खवणे ( ता.मंठा) येथील संस्कार प्रबोधिनी गुरुकुल निवासी शाळा, लिखित पिंपरी ( ता.परतूर ) येथील संत तुकाराम गुरुकुल या ठिकाणी बालकुमार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बालदिन ते साने गुरुजी जयंतीदिन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, हेलस कथामाला शाखेच्या प्रमुख कल्पना दत्तात्रय हेलसकर, जिल्हा कार्याध्यक्ष जमीर शेख, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, उपाध्यक्ष डाॅ.दिगंबर दाते, संतोष मुसळे, जगदीश कुडे, डाॅ.यशवंत सोनुने, पवन जोशी, रामदास कुलकर्णी, संदीप इंगोले, पवन कुलकर्णी दत्तात्रय राऊतवाड यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या जागरच्या निमित्त बालकांना सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. जास्तीत जास्त बालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालनातर्फे करण्यात आले आहे.

या शाळांत राबवणार विविध उपक्रम
बालदिन ते साने गुरुजी जयंतीदिन या उपक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काजळा, संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय जालना, कै.बाबूराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय, अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालय जालना, जेबीके विद्यालय टेंभुर्णी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीरामतांडा, माळतोंडी, राणीवाहेगाव, सायगाव डोंगरगाव येथील शाळांमधून उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...