आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंशिस्त अन् लसीकरणाचा प्रभाव:40 गावांतून कोरोना हद्दपार; जि.प. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकजुटीमुळे कोरोनाला रोखणे शक्य

ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीने जिल्ह्यातील ५४ हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर कोरोना होऊ नये म्हणून अनेकांनी स्वत:सह इतरांची काळजी घेत स्वयंशिस्तीचे पालन केले. पात्र लाभार्थींनी लसीकरण करून घेत नियम पालनाबाबत जनजागृती केली. याचा संयुक्तिक परिणाम म्हणून जिल्ह्यातील ४० गावांमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही तसेच ३६९ गावांतही ५ पेक्षा कमी रुग्ण अाहेत. गत आठवडाभरापासून बाधितांची संख्या घटत चालल्याने दिलासा मिळत असला तरी अजूनही ५५५ गावांत ५ हून अधिक रुग्ण आहेत. यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन व लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे जाणकार सांगत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३५७६८९ नमुने तपासण्यात आले. यात ६ एप्रिल २०२० रोजी पहिल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता एकूण बाधितांची संख्या ५९ हजार ५४ आहे. दरम्यान, यातील ९७८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ३७२० अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. ४५१ रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आलेे. बाधितांच्या सहवासात आलेल्या निकट व दूरच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करणे, नमुने तपासणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात दाखल करून तज्ञांच्या निगराणीत उपचार करणे, बरे झाल्यावर पुन्हा प्रकृतीबाबत पाठपुरावा करणे ही निरंतर प्रक्रिया १५ महिन्यांपासून सुरू आहे. यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यासह अद्ययावत उपचार साधनांचीही मोठी भूमिका राहिली आहे.

जिवाची बाजी लावून कोरोना वॉरियर्स २४ तास रुग्णसेवेत निष्ठेने काम करत असल्यामुळे ५४ हजार ३५६ रुग्ण कोरोनावर मात करू शकले, शिवाय ही लढाई आणखी नेटाने पुढे सुरूच आहे. कोरोनाला हरवण्यासाठी शासन, प्रशासन ते गावपातळीवर कार्यरत आरोग्यसेवक, आशा कायकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती एकजुटीने काम करत असल्यामुळे कोरोनावर हळूहळू नियंत्रण येऊ लागले.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकजुटीमुळे कोरोनाला रोखणे शक्य
शहर असो की गाव कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. गावपातळीवर शासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील ४० गावांत सध्या एकही रुग्ण नाही हे याचे फलित आहे. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करत स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी. नियमित मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे व लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात दाखल व्हावे, जेणेकरून तत्काळ उपचार सुरू होऊन रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होईल.- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

आज बैठकीत मांडणार कोराेनामुक्त गावांची यादी
जिल्ह्यातील ४० गावांत सध्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. शासन, प्रशासन व गावपातळीवर राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे हे शक्य झाले. ही गावे कोणती व त्यांनी कोरोनाला कसे रोखले याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क फोर्सच्या बैठकीत मांडली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

११४ रुग्ण निघाल्याने गावबंदी, आता तीनच रुग्ण
पाटोद्यात दीड महिन्यापूर्वी ११४ हून अधिक कोरोनाचे रुग्ण होते. यापैकी दोघांचा मृत्यूही झाला होता. याची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतस्तरीय दक्षता समितीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले. पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. तसेच दोन वेळा संपूर्ण गाव सॅनिटाइझ केले, बाहेरच्या लोकांनाही गावात येण्यास बंदी घातली. यामुळे कोरोनाचे रुग्ण घटले असून सध्या फक्त तीन बाधितांवर उपचार सुरू आहेत. - डॉ. सुनील चव्हाण, वैद्यकीय अधिकारी

बातम्या आणखी आहेत...