आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठणठणाट:मागणी पावणेदोन लाख डोसची, आले 12 हजार 900; पुन्हा लसीकरण मोहिमेला लागेल ब्रेक

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठवडा उलटूनही लसींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने आरोग्य यंत्रणाही हतबल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यासह पात्र लाभार्थींचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सरकारसह स्थानिक जिल्हा प्रशासन याबाबत आवाहन करत असून याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून लसींचा तुटवडा निर्माण झाला असून नियोजित सत्रेसुद्धा ऐनवेळी रद्द करावी लागत आहेत. दरम्यान, १३ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी एक लाख ७५ हजार डोसची मागणी डीएचओ डॉ. विवेक खतगावकर यांनी अतिरिक्त संचालक (आरोग्यसेवा, पुणे) यांच्याकडे केली होती. प्रत्यक्षात बुधवारी दुपारी १२ हजार ९०० डोस आले असून फक्त दीड-दोन दिवसच हे डाेस पुरतील व त्यानंतर पुन्हा खंड पडू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यात दररोज २५ हजार लाभार्थींचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश १५ दिवसांपूर्वी दिले होते. यानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही कामाला लागली. एक-दोन नव्हे, तर सात दिवसांचे नियोजन करून २०० हून अधिक केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवता येईल असा अॅक्शन प्लॅनही ठरला. लसीकरण केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले व त्यानुसार ड्यूट्यासुद्धा लावल्या. लसीकरण केंद्रावर ड्यूटी लावल्यामुळे त्यानुसार अधिकारी-कर्मचारीही प्रशिक्षण घेऊन दैनंदिन उद्दिष्टपूर्तीसाठी सज्ज झाले. कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित व प्रभावी ठरलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असतानाच लसींचा तुटवडा निर्माण झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांकडून उसनवारी करून डाेस मिळवावे लागले. यामुळे कसाबसा आठवडा उलटला. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज असल्याचे जाणकार सांगतात. यामुळे मुबलक लसी मिळाव्यात

यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे.
मागणीनंतर सात दिवसांनी पुरवठा : जालना जिल्ह्यात लसीकरणाचे किमान ७ दिवसांचे नियोजन करण्यासाठी प्रतिदिन २५ हजार याप्रमाणे १ लाख ७५ हजार डोसेसची आवश्यकता आहे. यासाठी कोविशील्ड लसीचे डोसेस द्यावेत, अशी विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी एका पत्राद्वारे अतिरिक्त संचालक (आरोग्यसेवा, पुणे) यांच्याकडे १३ एप्रिल रोजी केली होती. या पत्रात खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेऊन दिलेल्या सूचनांचाही संदर्भ देण्यात आला होता, तरीसुद्धा डोस येण्यासाठी आठ दिवस लागले.

१२ हजार ९०० डोसेसचे वाटप, आज १२० सत्रांचे नियोजन
शासनाकडून प्राप्त १२ हजार ९०० कोविशील्ड डोसेसचे १०२ लसीकरण केंद्रांना वाटप करण्यात येणार आहे. यात १ स्त्री रुग्णालय, ८ ग्रामीण रुग्णालय, १ उपजिल्हा रुग्णालय, ३० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५६ उपकेंद्रे व शहरी भागातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. डॉ. संतोष कडले, जिल्हा लसीकरण अधिकारी, जालना
जिल्ह्यात दररोज २५ हजार लाभार्थींचे लसीकरण करण्याचा निर्धार फोल

फक्त १६५८ लाभार्थींचे लसीकरण, उद्दिष्टपूर्ती रेंगाळली
बुधवारी दिवसभरात २३ लसीकरण केंद्रांवर १ हजार ६५८ लाभार्थींना डोस देण्यात आले. यात १ हजार ३९३ जणांनी पहिला, तर २६५ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. यासाठी १५७ व्हायल्स वापरण्यात आल्या. दरम्यान, आतापर्यंत ७ लाख २१ हजार ५४८ लाभार्थींना डोस देण्याचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात १ लाख ४७ हजार ७२९ डोस देण्यात आले.

खासगी हॉस्पिटलमध्ये लसींचा ठणठणाट : एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर खासगी हॉस्पिटलचा पुरवठा थांबवण्यात आला.त्यांच्याकडील पूर्वीच्या शिल्लक लसीही आता संपल्या आहेत. खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रे बंद असून लाभार्थींवर खेट्या घालण्याची वेळ आली आहे. लसींचा तुटवडा लक्षात आता फक्त शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण सुरू ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...